निवडणुकीच्या तोंडावर राज्यात दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव; काँग्रेसचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 04:19 PM2022-01-27T16:19:59+5:302022-01-27T16:20:48+5:30
भाजपाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे असा आरोप काँग्रेसनं केला आहे.
मुंबई - मुंबईतील मालाड मालवणी भागातील एका क्रीडासंकुलाच्या ‘वीर टिपू सुलतान क्रींडागण’ या नावावरून भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक मुंबई व राज्यातील वातावरण बिघडवत आहे. भाजपा नेते राज पुरोहित यांचे राज्यात दंगली घडतील हे विधान गंभीर व भडकाऊ आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी धार्मिक विद्वेष परवण्याचा भाजपा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
अतुल लोंढे म्हणाले की, टिपू सुलतान नावावरून भारतीय जनता पक्ष धार्मिक रंग देऊन राज्यातील वातावरण बिघडवू पाहत आहे. जीवघेणी महागाई, बरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यावर केंद्रातील भाजपा सरकार अपयशी ठरले असून या मुख्य मुद्द्यांना बगल देऊन पाकिस्तान, मंदिर, मशिद, धर्म संसदेच्या माध्यमातून धार्मिक मुद्दे चर्चेत आणून भाजपा राजकारण करत आहे. मुंबईत टिपू सुलतानच्या विषयावरून वातावरण पेटवून त्याचा निवडणुकीत फायदा उचलण्याचे हे षडयंत्र आहे. परंतु भाजपाने धार्मिक मुद्दे सोडून निवडणुका लढवून दाखवाव्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून दोन वर्षात सरकारने केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाचा प्रत्येक निवडणुकीत पराभव होत असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन घसरली आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्यासाठी टिपू सुलतानच्या नावावरून धार्मिक द्वेष पसरवून अशांतता पसरवण्याचा भाजपा प्रयत्न दिसत आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच टिपू सुलतानबद्दल कोणाला जास्त प्रेम आहे हे राज्यातील भाजपा नेत्यांनी कर्नाटकातील त्यांच्या नेत्यांकडून माहिती घ्यावी. कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतानचा गौरव करण्यात आला त्यावेळी भाजपाचेच सरकार होते. त्यामुळे आधी भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी अभ्यास करावा व नंतर बोलावे. महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे, येथे भडकाऊ विधाने करुन राज्यातील वातावरण बिघडवण्याचे काम कोणी करत असेल तर महाविकास आघाडीचे सरकार त्याची गंभीर दखल घेईल असंही लोंढेंनी म्हटलं.
राष्ट्रवादीचाही भाजपावर आरोप
टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजपा वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती, ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते, त्यांचा नावाचा विरोध करण्याचे काम भाजपा करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिकांनी केला आहे.