मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्ज न हटविण्याचे आदेश; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 08:13 AM2022-08-20T08:13:18+5:302022-08-20T08:14:58+5:30
यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होर्डिंग्ज, पोस्टर्स, बॅनर्स न हटिवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज लावल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्यासंदर्भात उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. या सर्व याचिकांवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी होती. बेकायदेशीर पोस्टर्स, बॅनर्स व होर्डिंग्स लावण्यात येणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिका व नगर परिषदांना दिले होते. एका याचिकाकर्त्यांचे वकील मनोज शिरसाट यांनी शुक्रवारी न्यायालयाला सांगितले की, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांचे बॅनर्स, होर्डिंग्ज व पोस्टर्स न हटविण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे कोणत्या प्रकारचे आदेश आहेत? बेकायदा होर्डिंग्जच्या प्रश्नावर राज्य सरकार किती गांभीर्याने घेत आहे, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे शिरसाट यांनी म्हटले. ‘शिरसाट यांनी यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे,’ असे निर्देश न्यायालयाने दिले.