फुटपाथवर बोलार्ड लावून व्हीलचेअरचा मार्ग अडविला; उच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 10:15 AM2024-01-04T10:15:21+5:302024-01-04T10:16:12+5:30
मुंबई महापालिका इतक्या बेफिकिरीने कशी वागू शकते? असा प्रश्न न्यायालयाने यावेळी पालिकेला केला.
मुंबई : फुटपाथवर बोलार्ड लावल्याने दिव्यांगांना व्हीलचेअरचा वापर करण्यास अडथळा निर्माण होत असल्याने मुंबईउच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेवर बुधवारी ताशेरे ओढले. मुंबई महापालिका इतक्या बेफिकिरीने कशी वागू शकते? असा प्रश्न न्यायालयाने यावेळी पालिकेला केला. न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.
फुटपाथवर बोलार्ड्स लावून व्हीलचेअरच्या मार्गात अडथळे आणल्याचे काही फोटो बुधवारच्या सुनावणीत मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आले. खंडपीठाने त्याची दखल घेत म्हटले की, त्यांनी कशाप्रकारे बोलार्ड लावले आहेत ते पाहा...पालिका इतक्या बेफिकिरीने कशी वागू शकते? तुमचे अधिकारी इतके बेफिकीर कसे? असे नाही की पालिकेने पैसे खर्च केले नाहीत किंवा प्रयत्न केले नाहीत. ज्या अधिकाऱ्यांनी ही यंत्रणा बसवली आहे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. व्हीलचेअर वापरणारी व्यक्ती त्यामधून जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले.
दादरच्या शिवाजी पार्कच्या २५ वर्षीय रहिवाशाने उच्च न्यायालयाला यासंदर्भात ई-मेल पाठविला. करण शहा जन्मापासूनच दिव्यांग असल्याने तो व्हीलचेअरचा वापर करत आहे. मात्र, पालिकेने फुटपाथवर बोलार्ड बसविल्याने तो फुटपाथवरून व्हीलचेअर नेऊ शकत नाही. त्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने यासंदर्भात स्वयंप्रेरणेने जनहित याचिका दाखल करून घेतली.