संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 23:02 IST2025-02-03T22:54:58+5:302025-02-03T23:02:17+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली

Bombay HC issues notice to Election Commission over heavy voting after 6 pm in Maharashtra assembly elections | संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

संध्याकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले? प्रकाश आंबेडकरांच्या प्रश्नावर कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Bombay HC: लोकसभेत एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रश्न उपस्थित केला असताना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि वकील प्रकाश आंबेडकर यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाला यावर दोन आठवड्यात उत्तर द्यावं लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. सुनावणीदरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः युक्तिवाद केला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान कसं वाढलं, यावर आक्षेप घेण्यात आला. त्यावेळचे मतदानाचे व्हिडिओ निवडणूक आयोगाने देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

"महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संशयास्पद मतदान प्रक्रियेविरोधात वंचित बहुजन आघाडीची रिट याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सायंकाळी ६ नंतर ७६ लाख लोकांनी मतदान कसे केले, असा महत्त्वाचा प्रश्न रिट याचिकेत उपस्थित करण्यात आला आहे.नमुंबई उच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगालाही नोटीस बजावली आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांची रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली ECf महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. विधानसभा निवडणुकीवेळी सायंकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा स्लिपचा रेकॉर्ड निवडणूक आयोगाकडे याचिकेद्वारे मागितला आहे, तो अद्याप दिलेला नाही. तसेच सायंकाळी सहा वाजल्यानंतरचे व्हिडिओ द्यावे. त्यावेळी व्हिडिओग्राफी केली आहे का? असा युक्तिवाद प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने आदर्श नियमावली पाळलेली नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

त्यामुळे आता  उच्च न्यायालयाने याचिकेची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यात नोटीसीला उत्तर देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने निव़डणूक आयोगाला दिला आहे.

Web Title: Bombay HC issues notice to Election Commission over heavy voting after 6 pm in Maharashtra assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.