चव्हाण पिता-पुत्राचा अनोखा विक्रम; चारही सभागृहांचे दोघेही झाले सदस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 06:22 AM2024-02-18T06:22:55+5:302024-02-18T06:24:52+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला जाणार आहे.
मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण आणि त्यांचे पुत्र, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावे एक आगळा विक्रम नोंदविला जाणार आहे. ‘चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले पिता-पुत्र’ असा अनोखा विक्रम आता त्यांच्या नावे असेल.
शंकरराव चव्हाण हे दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण हे एकदा मुख्यमंत्री होते. वडील आणि मुलगा अशा दोघांनीही मुख्यमंत्रिपद भूषविल्याचे हे अनोखे उदाहरण आहे.
शंकरराव चव्हाण मुंबई प्रांतासह पाच वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा ते विधान परिषदेचे सदस्य राहिले. दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. तीन वेळा ते राज्यसभेचे खासदार होते.
अशोक चव्हाण आता राज्यसभेवर जात आहेत. ते चार वेळा विधानसभेचे सदस्य होते. एकदा विधान परिषद सदस्य राहिले. दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आणि आता राज्यसभेचे सदस्य असतील. शंकरराव चव्हाण यांची राजकीय कारकीर्द ४६ वर्षांची राहिली. अशोक चव्हाण हे ३८ वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत.
शरद पवारही सदस्य
ज्येष्ठ नेते, माजी संरक्षणमंत्री शरद पवार हेदेखील चारही सभागृहाचे सदस्य राहिले आहेत. ते सहा वेळा विधानसभेचे सदस्य होते.
एकदा त्यांनी विधान परिषदेचे सदस्यपदही भूषविले. सात वेळा ते लोकसभेचे सदस्य होते. दोन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य आहेत.