Anand Mahindra: रशिया- युक्रेन युद्ध सुरू असताना आनंद महिंद्रांना आठवला बॉर्डर; ट्विट सोशल मीडियावर चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 06:14 PM2022-02-24T18:14:46+5:302022-02-25T00:14:46+5:30
मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा दररोज ट्विटरवर व्हिडीओ शेअर करतात. महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असतात. महिंद्रा शेअर करत असलेल्या ...
मुंबई: उद्योगपती आनंद महिंद्रा दररोज ट्विटरवर व्हिडीओ शेअर करतात. महिंद्रा सोशल मीडियावर अतिशय सक्रीय असतात. महिंद्रा शेअर करत असलेल्या व्हिडीओमुळे अनेकांना प्रेरणा मिळते. तर काहीवेळा त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमुळे मनोरंजनदेखील होतं. याचदरम्यान त्यांनी आता बॉर्डर चित्रपटामधील एक व्हिडिओ ट्विट केला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. रशियाने लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर युक्रेनमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. युक्रेनची राजधानी कीववर क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. युक्रेनमधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात धावपळ सुरु आहे. याचपार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी बॉर्डर चित्रपटामधील प्रसिद्ध 'संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं...' हे गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
Beautiful. But what strikes me— apart from their singing prowess—is the incredible breadth & diversity of our country & how music unites us.. https://t.co/MRaYV1giQe
— anand mahindra (@anandmahindra) February 24, 2022
आनंद महिंद्रा यांनी गाण्याचे कौतुक केले-
विशेष म्हणजे हे गाणे दोन लोकप्रिय लद्दाखी लोकगायिका पद्मा डोलकर आणि स्टॅनझिन नोर्गिस यांनी गायले आहे. लष्कर दिनानिमित्त जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या दोघांच्या आवाजात हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या दोन्ही कलाकारांनी अतिशय सुमधुर आवाजात हे लोकप्रिय देशभक्तीवर गाणं गायलं असून ते याचे आनंद महिंद्रा चाहते झाले आहेत. ट्विटरवर या दोघांचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, संगीत ही अशी गोष्ट आहे, जी वेगवेगळ्या वातावरणातील लोकांना एकत्र आणते.
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्ध सुरु-
रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ आहे. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तर युक्रेनने डझनभर रशियन सैनिक मारल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या लष्कराने आतापर्यंत 50 रशियन सैन्याचा खात्मा केला आहे आणि पूर्वेकडील 6 युद्धनौका नष्ट केल्या आहेत.