काँग्रेस-शिवसेनेकडे आहे मंत्र्यांची यादी तयार; पण राष्ट्रवादी काँग्रेसमुळे रखडला मंत्रिमंडळ विस्तार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 02:44 PM2019-12-06T14:44:18+5:302019-12-06T14:46:52+5:30
तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहू शकतात. पण खातेवाटप न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारलं घेरलं जाऊ शकतं
मुंबई - राज्यात सत्तासंघर्षाच्या जोरदार रस्सीखेचानंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झालं. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबर रोजी शिवाजी पार्कवर शपथ घेतली. मुख्यमंत्र्यासोबत प्रत्येक पक्षाच्या दोन मंत्री यांचाही शपथविधी पार पडला.
राज्यात सरकार स्थापन झाल्यापासून आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला नाही. मंत्री सुभाष देसाई यांच्या बंगल्यावर काँग्रेस-शिवसेना नेत्यांची बैठक झाली या बैठकीत दोन्ही पक्षाचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी तयार असल्याची माहिती आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्यापही मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु आहे. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला गेल्याने यापदासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
अजित पवारांनी केलेलं बंड पाहता त्यांना मंत्रिपद देण्याचे सर्वाधिकार शरद पवारांना देण्यात आले आहेत. मात्र शरद पवार सध्या संसदेच्या अधिवेशनानिमित्त दिल्लीत आहेत. गृह, अर्थ यासारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहेत. अशातच ही दोन्ही खाती महत्वाची असल्याने राष्ट्रवादीत दिग्गज नेतेमंडळीत रस्सीखेच असल्याचं समजतंय.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसीला मुलाखत देताना सांगितले की, राज्यात लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप व्हायला हवा. तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहू शकतात. पण खातेवाटप न झाल्यास येणाऱ्या अधिवेशनात विरोधकांकडून सरकारलं घेरलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितले.
याबाबत विरोधकांकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली परंतु भाजपा सरकारने आणलेले प्रकल्प मोडीत काढण्यात ते इतके बिझी आहेत की त्यांना मंत्रिमंडळ खाते वाटपासाठी वेळच नाही. कामकाज थंडावले आहे अशा शब्दात भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला टोला लगावला आहे.
तसेच मंत्रिपदे आणि महामंडळांच्या माध्यमातून तीनही पक्षांच्या आमदारांचे समाधान करण्याचा योग्य तो प्रयत्न ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेला आहे. त्यासाठी आमच्या सतत बैठका झाल्या आहेत. पण राजकीय परिस्थिती लक्षात घेता काही बदल अपेक्षित असावेत असेही ते म्हणाले. खातेवाटपाचा निर्णय दोन दिवसात होईल, सध्या अधिवेशन असल्यामुळे तेवढ्यापुरते खातेवाटप केले जाईल, नंतर विस्तार होईल त्यावेळी सगळे खातेवाटप होईल असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.