"मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत", तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 05:43 PM2023-07-12T17:43:25+5:302023-07-12T17:45:15+5:30

कुठल्याही पद्धतीचे समज-गैरसमज न ठेवता पुढे जाण्याचं ठरलं आहे. सरकारमध्ये कुठेही अडचण नाही, आम्ही एक दिलाने काम करत आहोत.

Cabinet expansion till tomorrow, Sunil Tatkare also challenged Jitendra Awhad | "मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत", तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला

"मंत्रीमंडळ विस्तार उद्यापर्यंत", तटकरेंनी जितेंद्र आव्हाडांनाही लगावला टोला

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज दिल्लीला रवाना झाले आहेत. दोन्ही नेते एकत्रित जाणार नाहीत. मात्र, दिल्लीत गेल्यावर तिथे दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. दिल्लीत हे दोन्ही नेते भाजपश्रेष्ठींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळाचा विस्तारावरही अंतिम निर्णय होईल. यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादीचे प्रमुख नेते सुनिल तटकरे यांनी, उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले. 

कुठल्याही पद्धतीचे समज-गैरसमज न ठेवता पुढे जाण्याचं ठरलं आहे. सरकारमध्ये कुठेही अडचण नाही, आम्ही एक दिलाने काम करत आहोत. पालकमंत्री पदासाठी आम्हीही आग्रही नाहीत. कारण, एकमताने काम करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री त्यासंदर्भात काय तो निर्णय घेतील. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि पालकमंत्र्यांची निश्चिती उद्या संध्याकाळपर्यंत होईल, असे सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. राज्याचे नवे मंत्रिमंडळ झाल्यापासून अजित पवार दिल्लीला गेले नाहीत. त्यामुळे, ते दिल्लीला जात आहेत. ज्यावेळी एकत्रितपणे काम करायचं असतं, त्यावेळी, त्यासंदर्भातील जाणीव मनात ठेवत काम करणं आवश्यक असते. आम्ही सर्वजण ते करत आहोत, असेही तटकरे यांनी सांगितलं. 

जितेंद्र आव्हाडांवर निशाणा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जात आहेत. राज्यात राजा म्हणून राहणारा व्यक्ती आता दिल्लीच्या दरबारी जाणार आहे, अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केल्यासंदर्भात प्रश्न सुनिल तटकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर, जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल पद्धतीच्या वक्तव्य करणाऱ्यांकडे फारसं लक्ष द्यावं असं मला वाटत नाही, असेही तटकरे यांनी म्हटलं.  

राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या खात्यांसाठी आग्रही

दरम्यान, राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यासह ऊर्जा, जलसंपदा, सहकार, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण या खात्यांची मागणी होत असल्याचं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादीकडून  सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी आग्रह होत असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 
 

 

Web Title: Cabinet expansion till tomorrow, Sunil Tatkare also challenged Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.