दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 02:24 AM2019-04-25T02:24:36+5:302019-04-25T02:25:15+5:30

मिलिंद देवरा, अरविंद सावंत यांनी दिली उत्तरे

Candidates from South Mumbai have examined candidates | दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

दक्षिण मुंबईत मतदारांनी घेतली उमेदवारांची परीक्षा

googlenewsNext

मुंबई : उच्च शिक्षित, श्रीमंत व आपल्या अधिकाराविषयी जागरूक असलेल्या दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू मतदारांनी एक विशेष बैठक आयोजित केली होती. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या सर्व उमेदवारांची या बैठकीत चक्क परीक्षा घेण्यात आली. आम्ही तुम्हालाच मतदान का करावे, असा त्यांचा थेट सवाल होता. सुमारे तासाभराच्या या चर्चेत शिवसेना-काँग्रेसची जुगलबंदीही रंगली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मिलिंद देवरा आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांच्यात थेट लढत आहे. गेला महिनाभर या उमेदवारांचा प्रचार दक्षिण मुंबईतील गल्लीबोळांत, झोपडपट्टी, इमारतींमध्ये सुरू आहे. मात्र निवडून आल्यानंतर त्यांची मतदारसंघासाठी पुढची योजना काय? याबाबत कोणीच बोलत नाही.

यामुळे नेपियन्सी रोड, सिटिझन्स फोरम, कॅरिमिएल रोड सिटिझन्स कमिटी आणि दि पेडर रोड रेसिडेन्टस असोसिएशन या चार रहिवासी संघटनांनी अल्टामाऊंड रोड येथील उद्यान परिसरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीतील चर्चेत काँग्रेसचे मिलिंद देवरा, शिवसेनेचे अरविंद सावंत, वंचित बहुजन आघाडी पार्टीचे उमेदवार डॉ. अनिलकुमार चौधरी आणि भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टीचे साहिल शाह यांनी प्रश्नांचा सामना केला.

यासाठी हवी आम्हाला संधी...
बॉम्बे हॉस्पिटलचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अनिलकुमार चौधरी यांनी, ‘‘शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र विकले गेले आहे. शिशुवर्गात शिक्षण घेण्यासाठी आज पालकांना एक लाख रुपये मोजावे लागतात. हे चित्र बदलण्यासाठी मला एक संधी द्या,’’ असे आवाहन मतदारांना केले.
तर शिवसेनेने या मतदारसंघात सर्वांत कमकुवत उमेदवार उभा केला अशा शब्दांत आपला अपमान केला होता. पण मी एक लाख २८ हजार मतांच्या फरकाने जिंकून आलो, तरीही हा अपमान आजही मला विसरता आलेला नाही, असे आवर्जून सांगितले. स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहन करीत आपल्याविरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी मिलिंद देवरा यांनी आठवण करून दिली.

शिवसेना-काँग्रेसमध्ये शाब्दिक चकमक़..
लोकांना २०१४ मध्ये नरेंद्र मोदींना केंद्रात पाहायचे होते. म्हणून येथील रहिवाशांनी उमेदवाराकडे दुर्लक्ष करीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना निवडून दिल्याचा टोला मिलिंद देवरा यांनी सावंत यांना अप्रत्यक्ष लगावला. त्यांना प्रत्युत्तर देत सावंत यांनी २००५ मध्ये दाखल करण्यात आलेला हा गुन्हा राजकीय स्वरूपाचा होता. त्यासाठी काढलेले वॉरंटही रद्द झाले आहे. चार भिंतींच्या आत राहून लोकांसाठी कधीही धावून न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवरच एकाही गुन्ह्याची नोंद होणार नाही. म्हणूनच काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी जामिनावर बाहेर आहेत, असा टोला शिवसेनेचे सावंत यांनी लगावला.

Web Title: Candidates from South Mumbai have examined candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.