इंदू मिल येथील स्मारकाला केंद्र सरकारमुळे विलंब; भाई जगताप यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 06:31 PM2021-12-07T18:31:35+5:302021-12-07T18:31:48+5:30
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्कवरील सभेसाठी राहुल गांधी येणार आहेत.
मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी काँग्रेस सरकारच्या काळात सर्व परवानग्या मिळाल्या होत्या. त्यानंतर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. त्याला सात वर्षे उलटूनही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. याबाबत जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा काम सुरू आहे इतकेच उत्तर दिले जाते. भूमिपूजनानंतरही स्मारकाचे काम सुरू व्हायला सात वर्षांचा विलंब का झाला, याचे उत्तर केंद्रातील भाजप सरकारने द्यायला हवे, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी केली.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगताप म्हणाले की, भूमिपूजनानंतर सात वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. अशीच स्थिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाची आहे. या स्मारकाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही. या विलंबामुळे जनमानसात केंद्र सरकारबाबत प्रचंड नाराजी आहे, असे जगताप म्हणाले. यावेळी कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर, सुरजसिंह ठाकूर उपस्थित होते.
शिवाजी पार्कवरील सभेसाठी सोनिया गांधी यांनाही आमंत्रण
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त शिवाजी पार्कवरील सभेसाठी राहुल गांधी येणार आहेत. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही आमंत्रण देण्यात आल्याचे भाई जगताप यांनी सांगितले.
काँग्रेसच्या जिवावरच महाराष्ट्रात सरकार
यावेळी यूपीएबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाई जगताप म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघडीचे सरकार काँग्रेसच्या जिवावरच आहे, याचा विसर पडता कामा नये. भाजपला रोखण्याचे काम आतापर्यंत काँग्रेसनेच केले असून यापुढेही काँग्रेस आपली भूमिका तशीच कायम ठेवेल.