"विरोधी पक्ष कुठे आहे, त्यांनी आत्मविश्वास गमावलाय", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फटकेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:42 PM2023-07-16T19:42:12+5:302023-07-16T19:42:47+5:30
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिलेच विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत आहे. उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना शिंदेंनी रणनीती स्पष्ट करताना विरोधकांना फटकारले. नेहमीप्रमाणे विरोधक चहापाण्याला आले नाहीत असे शिंदेंनी म्हटले.
राज्यात पाऊस चांगल्या प्रमाणात झाला नाही. पाऊस न आल्याने आम्हाला देखील चिंता आहे. शेवटी निसर्ग आहे लहरीप्रमाणे अतिवृष्ठी गारपीठ होत आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.
विरोधकांना फटकारले
"विरोधी पक्ष गोंधळलेला असून त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे हे देखील शोधले पाहिजे. आम्ही तिघांनीही विरोधी पक्षनेते पद सांभाळले आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील त्यांचं काम चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. विरोधकांना चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. फडणवीस बॅटिंग, बॉलिंग करतात चौकार आणि षटकार मारतात. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी राज्याबद्दल प्रेम दाखवल्यामुळे राज्याबाहेर गेलेले अनेक प्रकल्प आले", अशा शब्दांत शिंदेंनी फडणवीसांचे कौतुक केले.
तसेच अजितदादा सरकारमध्ये आल्यापासून विरोधी पक्षांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात लोकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. विरोधी पक्ष कितीही कमकुवत असला तरी त्यांना दुय्यम स्थान देणार नाही. सरकार पडणार असं म्हणू नका नाही तर आणखी काही होईल, असा टोला देखील शिंदेंनी सरकार पडणार असं म्हणणाऱ्यांना लगावला.