दिवसभर ताटकळले, संध्याकाळी भेट झाली; चर्चेत मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना दिला मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 11:47 PM2024-03-14T23:47:28+5:302024-03-14T23:49:42+5:30
मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती शिवतारे यांनी माध्यमांना दिली आहे.
Shivsena Vijay Shivtare ( Marathi News ) : शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. बारामती हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून महायुतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळण्याची शक्यता आहे. असं असताना शिवतारे यांनी अजित पवारांवर घणाघाती हल्ला चढवत उमेदवारीची घोषणा केल्याने अजित पवारांचा गटही आक्रमक झाला. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाकडून करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांना भेटीसाठी बोलावलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिवतारे आपल्या समर्थकांसह वर्षा या निवासस्थानी आल्यानंतर त्यांना सहा तासांहून अधिक काळ ताटकळत बसावं लागलं. अखेर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री आणि शिवतारेंमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय घडलं, याबाबतची माहिती शिवतारे यांनी माध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेचा तपशील सांगताना विजय शिवतारे म्हणाले की, "आमची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी माझ्यासोबत पुरंदरचे जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि इतर प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते होते. आम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला होत असलेला त्रास मुख्यमंत्र्यांना सांगितला. आमच्या भावना त्यांना कळवल्या असून त्यांनी दोन दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला आहे," अशी माहिती शिवतारे यांनी दिली आहे. तसंच दोन दिवसानंतर पुन्हा निवडक पदाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांशी आमची चर्चा होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीने काय इशारा दिला?
विजय शिवतारे यांच्या उमेदवारीवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटलं होतं की, "मागील दोन दिवसांपासून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अपमान करतायत, पक्षाच्या शक्तिस्थळांवर आघात करत आहेत. बारामती लोकसभेची जागा अपक्ष लढणार अशी घोषणा शिवतारेंनी केलीय. शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान असल्याचा दावा करतात. यासाठी त्यांच्या या भूमिकेवर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा. शिवतारे यांच्या भूमिकेवर एकनाथ शिंदे मूकदर्शक बनले आहेत. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपाने अत्यंत संयम आणि मर्यादा बाळगली आहे. त्यामुळे याबाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी," अशी मागणी परांजपे यांनी केली होती.
विजय शिवतारेंकडून उमेदवारीची घोषणा
कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विजय शिवतारे यांनी दोन दिवसांपूर्वी त्यांची मते जाणून घेतली. त्यात कार्यकर्त्यांनी एकमताने विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा निवडणूक लढवावी असा ठराव मांडत तो मंजूर केला. त्यामुळे बारामतीच्या मैदानात विजय शिवतारे हेदेखील उमेदवार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवतारेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीत अजित पवारांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. नमो विचार मंच यामाध्यमातून शिवतारे निवडणुकीत अपक्ष उभे राहणार आहेत.