मुख्यमंत्र्यांचे राजकीय ‘श्री’दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:12 AM2018-09-15T04:12:39+5:302018-09-15T04:12:47+5:30
राजकीय गुफ्तगू : कृपाशंकर सिंह, जयदत्त क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने राजकीय गोळाबेरीज सुरु केली असून काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठीतून राजकीय ‘प्रसाद’ वाटल्याची चर्चा आहे.
शिवसेनेचे सचिव आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन गणपतीचे दर्शन घोतले. ‘मातोश्री’ आणि ‘वर्षा’मध्ये सांधणारा दुवा म्हणून नार्वेकरांकडे पाहिले जाते. मुंबई काँग्रेसचे बडे नेते कृपाशंकरसिंह हे भाजपात जाणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मुख्यमंत्री त्यांच्याही निवासस्थानी गणपती दर्शनास गेले होते. राष्ट्रवादीमध्ये नाराज असलेले बीडचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी वर्षा बंगल्यावर जावून मुख्यँंत्र्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादी सोडून भाजपा आल्यानंतर विधान परिषदेवर गेलेले सुरेश धस हे सोबत होते. यावेळी मुख्यमंत्री व क्षीरसागर यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे. क्षीरसागर हे राष्टÑवादीवर नाराज असून ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांची प्रदेश राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली असली तरी त्यांची नाराजी कमी झालेली नाही, असे मानले जाते. त्यातच त्यांचे पुतणे आणि कट्टर विरोधक संदीप क्षीरसागर यांना बीड जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्षपद देऊन जयदत्तअण्णा यांच्या जखमेवर मीठच चोळल्याचे मानले जाते.
अमित शहा गणपती दर्शनाला
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सपत्नीक गणपती दर्शन घेतले. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशीष शेलार यांच्या वांद्रेतील सार्वजनिक गणेशोत्सवाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी श्री सिद्धीविनायक आणि लालबागच्या राजाचेदेखील दर्शन घेतले.
काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर आपण सध्या तरी काँग्रेसमध्ये असून पुढचे काही सांगू शकत नाही, अशी सूचक प्रतिक्रिया सिंह यांनी माध्यमांना दिली.