चॉकलेटच्या बाप्पाची परदेशवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 02:10 AM2018-09-09T02:10:39+5:302018-09-09T02:10:54+5:30
गेल्या काही वर्षांपासून सण, उत्सव पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : गेल्या काही वर्षांपासून सण, उत्सव पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी विविध पातळ्यांवर समाजातील अनेक मंडळी झटत आहेत. अशाच प्रकारे गणेशोत्सव आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजऱ्या करणाºया रिंतू राठोड या चॉकलेटचा बाप्पा घडवीत आहेत. यंदा या चॉकलेटच्या बाप्पांना सातासमुद्रापारही मागणी आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणाची काळजी घेत काहींनी शाडूच्या, तर काहींनी कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सांताक्रूझ येथील रिंतू कल्याणी राठोड यांनी अनोखा प्रयोग केला आहे. याविषयी अधिक माहिती देताना रिंतू राठोड यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून या उपक्रमाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाल्याने यंदा ५१ मूर्ती घडविण्याची आॅर्डर आली आहे. पैकी १२ मूर्ती घडवून झाल्या आहेत.
>वजन ३५ ते ४० किलो
चॉकलेटची एक मूर्ती घडविण्यासाठी साधारण १२ ते १८ तास लागतात. या मूर्तींचे वजन साधारण ३५ ते ४० किलो असते. या उपक्रमाविषयी समाज जागरूक आहे, याचा आनंद होतो, असे राठोड यांनी आवर्जून नमूद केले. याशिवाय, राठोड यांच्या घरीही चॉकलेटचा बाप्पा विराजमान होतो. त्याचे विसर्जन केले जात नाही. अखेरच्या दिवशी समाजातील वंचित मुलांना त्याचा प्रसाद दिला जातो, अशी माहिती त्यांनी दिली.
यंदा मेलबर्न, हाँगकाँग, दुबई, आॅस्ट्रेलिया आणि सिंगापूरला हे चॉकलेट बाप्पा रवाना होणार आहेत. परदेशातील भक्तगण स्वत: येऊन या बाप्पाच्या मूर्ती घेऊन जात आहेत, असेही राठोड यांनी सांगितले. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे, खोलीच्या सामान्य वातावरणात बाप्पाचे चॉकलेट वितळू नये, यासाठी खास तरतूद करण्यात आली आहे.