कसबा निकाल अन् विधानसभेत फटकेबाजी; नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचा खोचक चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:42 PM2023-03-02T12:42:07+5:302023-03-02T12:42:35+5:30
मी नाना पटोलेंचे अभिनंदन करतो. जो निकाल आला आहे तो स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
मुंबई - कसबा, चिंचवड याठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्यात भाजपाचा गड असलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसनं सुरुंग लावला आहे. गेल्या २८ वर्षापासून या मतदारसंघात भाजपा आमदार निवडून येत होते. परंतु यंदाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी ११ हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद राज्यातील विधानसभेतही उमटले.
राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. आज सभागृह सुरू असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत पाँईट ऑफ ऑर्डर उपस्थित करताना म्हटलं की, कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. ११ हजारांच्या मताधिक्यांनी मविआ उमेदवार निवडून आलेत. त्यांच्या बसण्याची जागा आपल्याला करावी लागेल असं त्यांनी सभागृहात म्हटलं त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना, तुम्ही ११ महिने विधानसभेचे अध्यक्ष होता. आपण निकालाबाबत जे काही सांगितले त्याबाबत रितसर निवडणूक अधिकाऱ्यांकडून विधिमंडळाला कळवले जाईल. त्यानंतर रितसर नवनिर्वाचित आमदारांना बसण्याची सोय केली जाईल, तुम्ही निश्चिंत राहावं असं त्यांनी म्हटलं.
तर मी नाना पटोलेंचे अभिनंदन करतो. जो निकाल आला आहे तो स्वीकारला पाहिजे. चिंचवडचा निकालही स्वीकारावा लागेल. कसबा मतदारसंघातील निकालाबाबत आम्ही आत्मचिंतन करू तसे नानाभाऊ तुम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. कारण ३ राज्याच्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेस कुठे दिसत नाही. आता तुमच्यावर अशी वेळ आली एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावे लागते. त्यामुळे थोडं आत्मचिंतन तुम्ही करा आणि थोडं आम्ही करतो असा टोला देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंना लगावला आहे.
कसबा इथं भाजपाच्या मुक्ता टिळक यांनी २०१९ ची निवडणूक लढवली होती. परंतु अलीकडेच मुक्ता टिळक यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. याठिकाणी भाजपाने टिळक यांच्या कुटुंबातील कुणाला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. परंतु त्यानंतर भाजपाविरोधात वातावरण तयार झाले. याचा फटका मतदानात झाला. ज्या भागात भाजपाला मतदान होत होते त्याठिकाणीही धंगेकरांना चांगले मतदान झाले. मतमोजणीच्या सुरुवातीपासून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. शेवटी ११ हजार मताधिक्यांनी रवींद्र धंगेकरांचा विजय झाला.