काँग्रेस-ठाकरे गटात जागा वाटपावरून जुंपली; दावे-प्रतिदावे, संजय राऊत २३ जागांवर ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 06:02 AM2023-12-30T06:02:45+5:302023-12-30T06:03:00+5:30
महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागा वाटपावरून संघर्ष पेटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात जागा वाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात असून, यावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. तर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीत २३ जागा लढवणारच, असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे.
पक्ष फुटीवरून जागावाटप ठरत नाही. पक्ष फुटूनही शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असल्याचे विधान संजय राऊत यांनी केले होते. लोकसभेला आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यातील १८ जागांवर विजय मिळवला होता. संभाजीनगरमध्ये थोडक्या मतांनी पराभव झाला.
शिवसेनेकडे किती मते हे सांगणे कठीण-निरुपम
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. २०१९च्या निवडणुकीतील संदर्भ आता चालणार नाहीत. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात जे काही घडले, ते दुर्भाग्यपूर्ण आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मते आहेत. हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे जागांबाबत दावा करणे चुकीचे असल्याचे निरूपम म्हणाले. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे ‘मविआ’त ठरले आहे. काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार, यावर हायकमांड आणि आमचे एकमत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी वक्तव्य करत असेल, तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.