देवेंद्र फडणवीस, अजितदादा, भुजबळ, वळसे-पाटील विधानभवनात एकत्र भेटले... सगळेच चक्रावले!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 01:34 PM2019-11-25T13:34:34+5:302019-11-25T14:13:20+5:30

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ व दिलीप वळसे- पाटील एकत्र भेटल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला.

CM Devendra Fadnavis,Deputy CM Ajit Pawar, Chagan Bhujbal, Dilip Walse Patil met together at Vidhan Bhavan | देवेंद्र फडणवीस, अजितदादा, भुजबळ, वळसे-पाटील विधानभवनात एकत्र भेटले... सगळेच चक्रावले!

देवेंद्र फडणवीस, अजितदादा, भुजबळ, वळसे-पाटील विधानभवनात एकत्र भेटले... सगळेच चक्रावले!

Next

मुंबई: राज्यातील राष्ट्रपती राजवट हटून सरकार स्थापन झालं असलं, तरी सत्तापेच काही सुटलेला नाही. कारण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुमत नसतानाही बेकायदेशीरपणे सरकार स्थापन केल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीने केला आहे. त्यासाठी त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतलीय. राज्यात तातडीने बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश द्यावेत, हंगामी अध्यक्ष निवडून ही चाचणी घेतली जावी, अशी त्यांची मागणी आहे. त्यासाठी आपापली ताकद दाखवण्याचाही ते प्रयत्न करत आहेत. असं असतानाच, आज विधानभवनात देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील एकत्र दिसले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त विधानभवनात यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी शासकीय अधिकारी आणि नेतेमंडळी येत आहेत. वास्तविक, त्याचसाठी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे-पाटील हेही या ठिकाणी पोहोचले होते. परंतु, फडणवीस आणि अजित पवार येईपर्यंत हे दोघंही थांबले. त्यांनी एकत्र जाऊन यशवंतरावांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. हे चित्र लक्षवेधी ठरलं.

तसं तर, मुख्यमंत्री किंवा कुठल्याही मंत्र्यांना विरोधी पक्षांचे नेते वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतात. कधी शासकीय कार्यक्रमात, तर कधी बैठका-परिषदांमध्ये. परंतु, राज्यातील सत्तेसाठी अत्यंत चुरशीचा सामना सुरू असताना, या नेतेमंडळींचं एकत्र भेटणं चर्चेचा विषय झालं. 

 अर्थात, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील ही नेतेमंडळी अजित पवार यांना भेटण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी आली होती. त्यांच्यात बराच वेळ चर्चाही झाली. परंतु, अजितदादा माघार घेण्याची चिन्हं अजून तरी दिसत नाहीत.

दरम्यान,  राज्यपालांना रातोरात हटवलेली राष्ट्रपती राजवट आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली मुख्यमंत्रिपदाची शपथ यावरुन आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद झाला. विधानसभेत आजच बहुमत चाचणी घ्या, अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. तर ठरलेल्या वेळीच बहुमत चाचणी होऊ द्या, अशी मागणी भाजपा आणि सरकारच्या बाजूनं करण्यात आली. या प्रकरणी उद्या सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

Web Title: CM Devendra Fadnavis,Deputy CM Ajit Pawar, Chagan Bhujbal, Dilip Walse Patil met together at Vidhan Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.