राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे गैरहजर; कारण काय?, चर्चा तर होणारच...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:13 PM2023-07-05T19:13:39+5:302023-07-05T19:14:31+5:30
राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असून मंगळवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचल्या.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असतानाही अचानक राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांचा शपथविधी झाला. त्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचं स्वागतही करण्यात आलंय. मात्र, या दुपारच्या शपथविधीचा अवकाळी फटका शिंदे गटाला बसल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. विशेष म्हणजे शिंदेंसोबत असलेल्या काही आमदारांना राष्ट्रवादीच्या या टायमिंगची कल्पनाही नव्हती. त्यामुळे, ते नाराज असल्याचे आता समोर येत आहे. त्यातच, मुख्यमंत्री शिंदेंची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आजच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती चर्चेत आहे.
राष्ट्रपतीपद स्वीकारल्यानंतर द्रौपदी मुर्मू पहिल्यांदाच तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या असून मंगळवारी संध्याकाळी नागपुरात पोहोचल्या. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे स्वागत केले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे तात्काळ मुंबईला रवाना झाले. विशेष म्हणजे आज चंद्रपूर येथे राष्ट्रपतींच्या स्वागताला आणि कार्यक्रमलाही ते उपस्थित नव्हते. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी राष्ट्रपतीचे स्वागत केले. चंद्रपूरमधील राष्ट्रपतींच्या स्वागताच्या फोटोतून मुख्यमंत्री शिंदे गायब असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
अजित पवारांच्या अचानक एंट्रीमुळे शिदे गटात मोठी नाराजी पसरल्याची चर्चा आहे. कारण, मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या शिंदेंच्या आमदारांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. अचानक राष्ट्रवादीच्या ९ आमदारांचा शपथविधी पार पडल्याने आता मंत्रिपदाच्या शर्यतीतील कोणाची विकेट पडणार याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यासोबतच, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनाच आता खातेवाटप करायचे आहे. त्यातही, अर्थ, जलसंपदा यांसारखी महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला देता कामा नये, असा सूर शिंदे गटातील बड्या नेत्यांचा आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांची मोठी कोंडी झाली असून आपल्यासोबत आलेल्या आमदारांना कसं समजवायचं, त्यांची नाराजी कशी दूर करायची, हे शिंदेंपुढचं मोठं आव्हान आहे. हा सगळा पेच सोडवण्यात व्यग्र असल्यानेच ते राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेले नसावेत, असा अंदाज आहे.
बंडानंतर हिरो ठरलेल्या एकनाथ शिंदेंच्या पिक्चरमध्ये अचाकन दुसऱ्या हिरोची एंट्री झाली. मात्र, ज्यांना व्हिलन ठरवून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हिरो ठरले, सत्तेत सहभागी झाले. त्याच अजित पवारांना आता महायुती सरकारमध्ये स्थान मिळालंय. ज्या अजित पवारांनी निधी दिला नाही, असा आरोप शिंदेंच्या आमदारांनी केला, गुवाहाटी गाठली, त्याच अजित पवारांचे राजभवनात पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि अभिनंदन झाले. आता, त्याच अजित पवारांना अर्थखाते दिले तर पुन्हा जतनेसमोर कुठल्या तोंडाने जायचे?, असा प्रश्न शिंदे गटाला पडला आहे.
...तर नाराजीचा स्फोट होईल - कडू
या पार्श्वभूमीवर, माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदारसंघ फोडले जात होते, असा आरोप होता. मात्र, आता ज्या नेत्यांवर शिंदे गटाकडून आरोप केले जायचे, त्याच नेत्यांना भाजपने जवळ केले आहे. त्यामुळे नक्कीच शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा स्फोट होऊ शकतो, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय.