“भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली”; CM एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:50 PM2024-01-13T12:50:13+5:302024-01-13T12:50:31+5:30
Prabha Atre Sad Demise: प्रभा अत्रे यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्रद्धांजली वाहिली.
Prabha Atre Sad Demise: जेष्ठ प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वरयोगिनी प्रभा अत्रे यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यासाठी त्या सध्या युट्यूबच्या माध्यमातून काम करत होत्या. हृदयविकाराचा झटका आला म्हणून खासगी रूग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारापूर्वीच प्रभा अत्रे यांची प्राणज्योत मालवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रभा अत्रे यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला.
भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेले सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचे अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचं योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केले. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचे गाणे स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारे होतच. पण आपल्या संगीत क्षेत्राचे देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारे होते. त्यांनी भारतीय संगीताचे हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत
आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. पण संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभाताई अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभाताई अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून गणल्या जात होत्या. त्या पं. सुरेशबाबू माने आणि हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या होत्या. भारत सरकारने त्यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल १९९० मध्ये "पद्मश्री" आणि २००२ मध्ये "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित केले होते. हे पुरस्कार भारतातील अनुक्रमे चौथ्या तिसऱ्या क्रमांकाचे पुरस्कार आहेत. तसेच २०२२ मध्ये "पद्मविभूषण" देऊन त्यांचा गौरव केला. हा भारतरत्ननंतर सर्वोच्च नागरी सन्मान आहे.