Maharashtra Politics: “आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर तुम्ही कायम आहात”; शिंदे-फडणवीसांनी घेतली अजितदादांची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 08:50 PM2023-02-26T20:50:01+5:302023-02-26T20:51:05+5:30
Maharashtra News: मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडे तरी माझे वजन आहे ना, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी लगावला.
Maharashtra Politics: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या गौप्यस्फोटानंतर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे यांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर पहाटेच्या शपथविधीवरून टोला लगावला. याला देवेंद्र फडणवीसांनी लगेच प्रतिसाद दिला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. चहापानाच्या कार्यक्रमात विरोधकांनी आले पाहिजे. सूचना केल्या पाहिजेत. अजित पवार म्हणाले की, चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्रद्रोह झाला असता. मी तर असे सांगतो, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. हसीना पारकर ही दाऊदची बहीण. तिला यांनी चेक दिलेत. ज्यांनी देशद्रोह केला त्यांचा राजीनामा घेण्याची त्यांनी हिंमत दाखवली नाही. बरे झाले! त्यांचे साथीदार अजित पवार आहेत. त्यांच्याबरोबर चहा पिणे टळले. महाराष्ट्रद्रोह मोठा की देशद्रोह मोठा? अशी विचारणा करत एकनाथ शिंदेंनी अजित पवारांनी जोरदार पलटवार केला.
आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर तुम्ही कायम आहात
पुढे बोलताना, अजित पवार हे एकनाथ शिंदे यांनी निष्ठा बदलली म्हणता. आता मी असे बोलू शकतो, अजित पवारांनी सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली आणि सायंकाळी राष्ट्रवादीत परत आले. मी ते नाही केले. मी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे गेलो. अगदी सगळ्यांनी मान्य केले, असे एकनाथ शिंदे म्हणत असतानाच उपमुख्यमंत्री म्हणाले की, आणि माझ्यासोबत घेतलेल्या शपथेवर तुम्ही कायम आहात. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर भर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर शिंदे यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर उत्तर दिले.
दरम्यान, मी कायमच असतो. एकदा निर्णय घेतला तर परत फिरत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये थोडे तरी माझे वजन आहे ना?, असा टोला लगावत अजित पवारांची परिस्थिती मी समजू शकतो. आरोप करताना पुरावा पाहिजे. अन्यथा आरोप कुणीही करु शकतो. आरोप करताना आपण मोठ्या पदावर राहिलेले आहात हे लक्षात ठेवले पाहिजे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी सुनावले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"