मिलिंद देवरांचा काँग्रेसला रामराम; पक्षप्रवेशावर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 01:24 PM2024-01-14T13:24:17+5:302024-01-14T13:26:14+5:30
CM Eknath Shinde On Milind Deora Decision: काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
CM Eknath Shinde On Milind Deora Decision: गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नाही हे जवळपास स्पष्ट झाल्याने मिलिंद देवरा यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेस नेत्यांनी मिलिंद देवरा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मिलिंद देवरा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
मीडियाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला एका उंचीवर नेत आहेत आणि तुम्ही घरात बसून १० वर्ष राज्य मागे टाकले. म्हणून आम्ही सरकार बदलले. मागे पडलेले राज्य आता पुढे जात आहे. बंद पडलेले प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. मेट्रो असेल, कारशेड असेल, शिवडी-न्हावा शेवा असेल, मिसिंग लिंक असेल, इतर अनेक प्रकल्प जे तुम्ही बंद केले होते. अहंकारापोटी राज्याला मागे नेले, राज्यातील जनतेचे नुकसान करणे दुर्दैवी आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी सडकून टीका केली.
मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होत आहे, असे मी ऐकतोय
मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली. यावर बोलताना, मिलिंद देवरा यांचा पक्षप्रवेश होत आहे, असे मी ऐकतोय. अद्याप मला माहीत नाही. पण ते पक्षप्रवेश करणार असतील तर मी त्यांचे स्वागत करतो. रामदास कदम यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. बाकी अधिक काही माहिती नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, मी विकासाच्या मार्गावर जात आहे, अशी एका वाक्यात प्रतिक्रिया मिलिंद देवरा यांनी दिली. राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळेस शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर उपस्थित होते. दर्शन घेतल्यानंतर माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मिलिंद देवरा यांनी यावर अधिक काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तत्पूर्वी, मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाबरोबर असलेले ५५ वर्षांचे नाते मी संपवत आहे, अशी पोस्ट मिलिंद देवरा यांनी एक्सवर शेअर केली.