सहानुभूती कसली?; एकनाथ शिंदे निघालेले, पत्रकारांचा तो प्रश्न, गाडी पुन्हा थांबवली, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 08:49 AM2024-02-07T08:49:50+5:302024-02-07T08:59:49+5:30
आयोगाने मेरिटवर अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे अजित पवार यांचे मी अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. त्यामुळे निवडणूक आयोगाने मेरिटवर अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे अजित पवार यांचे मी अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आम्हाला देखील बहुमताच्या जोरावर निवडणूक आयोगाने आम्हाला नाव आणि पक्षाचं चिन्ह दिलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले. लोकसभेत महायुतीला ४५ जागा मिळतील. तर विधानसभेत देखील बहुमत मिळेल. महायुतीचं सरकार, सर्व सामान्य लोकांचं सरकार, काम करणारं सरकार लोकांना हवं आहे. त्यामुळे पुन्हा आमचं सरकार स्थापन होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
माध्यमांशी संवाद साधल्यानंतर एकनाथ शिंदे निघाले, मात्र पत्रकारांनी सहानुभूतीचा विषय राहिला, असं म्हणाले. यावर एकनाथ शिंदेंनी पुन्हा गाडी थांबवली आणि सहानुभूती कसली?, असा प्रश्न विचारला. यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सहानभुती मिळेल?, असं विचारलं. यावर लोक कामाला महत्व देतात. लोकांना काम हवंय. लोकांना विकास पाहिजे. आज चौफेर विकास राज्यामध्ये होतोय. आज महाराष्ट्र देशामध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्ये पहिलं राज्य आहे. केंद्र सरकारचं महाराष्ट्राला पाठबळ आहे. त्यामुळे आमचं सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतंय. त्यामुळे जनाता आमच्यासोबत आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
पत्रकारांशी संवाद..
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 6, 2024
🗓️ 06-02-2024📍मुंबई https://t.co/rp4RywTH2O
निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?
- अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
- शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
- महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
- एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
- राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं.
- ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
- राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत.