सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगलेले, काल जाऊन ते वेशीवर टांगले;शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 01:16 PM2023-06-24T13:16:08+5:302023-06-24T13:21:03+5:30
३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी पाटण्यातील बैठकीत घेतला. तथापि, नियोजनाबबत पुढील महिन्यात शिमला येथे आगामी नियाेजनाबाबत सल्लामसलत करण्याचेही यावेळी ठरले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह १७ पक्षांचे जवळपास ३२ प्रतिनिधी हजर होते.
विरोधकांच्या या बैठकीत उद्धव ठाकरे सामील झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
सत्तेसाठी शिवसेना पक्ष, बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवणाऱ्या अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस, राजद, पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेस, जेडीयू यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर उभारणीला आणि कलम ३७० रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. ३७० कलमाचे समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहेत, असं जोरदार निशाणा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर साधला.
दरम्यान, ठाकरे गट माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलैला मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहे. महापालिका विसर्जित होऊन एक वर्ष लोटले तरी निवडणुका घेण्याची हिंमत नाही. सरकारकडून पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. हा जनतेचा पैसा असून, त्याचा हिशोब द्यावाच लागेल. या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. यावरुनही एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं आहे. कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या मांडीला मांडी लाऊन बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून १ जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत. त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
वटहुकुमावरून ‘आप’ची वेगळी चाल
आम आदमी पक्षाने दिल्लीशी संबंधित केंद्राच्या वटहुकुमावर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत विरोधी पक्षांच्या कोणत्याही बैठकीला उपस्थित राहणार नाही, असे सांगून विरोधी ऐक्याच्या संपूर्ण प्रयत्नावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. वटहुकमावर ‘आप’चे समर्थन करण्याच्या मुद्यावर मल्लिकार्जुन खरगे यांनी तत्वत: पाठिंबा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे.