शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:01 AM2023-04-09T08:01:31+5:302023-04-09T08:03:17+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM Eknath Shinde has reacted to the talks of NCP Chief Sharad Pawar joining the NDA. | शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

शरद पवार NDAमध्ये सामील होणार?; अयोध्यात पोहचताच एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितले!

googlenewsNext

लखनऊ/मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नियोजित अयोध्या दौऱ्यासाठी शनिवारी विशेष विमानाने लखनऊमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांचे लखनौ विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात स्वागत भव्य स्वागत करण्यात आले. आज दुपारी रामलल्लाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री तेथील महाआरतीत सहभागी होणार आहेत. तब्बल नऊ तासाच्या दौऱ्यात ते भव्य राममंदिराच्या निर्मितीचा आढावा घेणार आहेत.

महाआरतीनंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. दौऱ्यासाठी शिवसैनिक विशेष गाडीने आधीच अयोध्येला पोहोचले आहेत. मंत्री, खासदार, आमदार यांच्यासाठी हॉटेल, गेस्ट हाऊस, धर्मशाळा बुक आहेत. दरम्यान याआधी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अदानी ग्रुपबाबत केलेल्या विधानावरही एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, शरद पवार म्हणाले असतील, तर त्यांनी काही विचार करूनच सांगितले असावे.हिंडेनबर्गसारखी एजन्सी प्रश्न उपस्थित करते. कुणी काही बोललं आणि कुणाला टार्गेट केलं, असं होऊ नये. अदानी प्रकरणाची सर्वोच्च न्यायालय चौकशी करत आहे. तपास व्हायला हवा, पण कुणाच्या तरी आरोपावरून कुणाला टार्गेट करणे, ही आपल्या अर्थव्यवस्थेला हानी पोहोचवणारी बाब आहे. उद्योगाला चालना देण्याचे काम प्रत्येकजण करतो आणि आपल्याला उद्योग पुढे जाण्याची गरज आहे.

दुसरीकडे, शरद पवार एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांवर एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांचे (शरद पवार) विधान असे जोडू नका. याबाबत सध्या काही सांगता येणार नाही. यावर नंतर बोलता येईल. आता आम्ही राममंदिरात आलो आहे, अयोध्येत दर्शन घ्यायला आलो, असं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी उद्योगसमूहाबद्दल जो अहवाल प्रसिद्ध केला, तशा अर्थाची वक्तव्ये काही व्यक्तींनी याआधीही केली होती. त्यावेळीही संसदेत गदारोळ झाला होता; पण संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अदानी प्रकरणाला वाजवीपेक्षा अधिक महत्त्व देण्यात आले, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. अदानी व अंबानी उद्योगसमूहांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी ज्या प्रकारे लक्ष्य करत आहेत, ते आपल्याला मान्य नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार -

शिवसेना-भाजपा युती राज्यात अत्यंत मजबुतपणे काम करत आहे, विकासाचे काम करत आहे. पूर्वी राज्यात (महाराष्ट्रात) साधूंचे हत्याकांड झाले, तसे आमच्या राज्यात अजीबात होणार नाही. आमच्या राज्यात विकासाची कामे होती. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे मंत्री आमदार खासदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्येत येणार आहेत, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्यांचे स्वागत -

लखनऊ विमान तळाबाहेर ढोलताशांच्या गजरात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे मोठा हार आणि गदा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शिंदे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, आढळराव पाटील, राम शिंदे आदी नेतेही आयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.

Web Title: CM Eknath Shinde has reacted to the talks of NCP Chief Sharad Pawar joining the NDA.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.