'मातोश्री'तून थेट 'बारामती'ला फोन; "आमचे नगरसेवक परत पाठवा!"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 06:26 PM2020-07-06T18:26:52+5:302020-07-06T18:51:13+5:30
पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
मुंबई/अहमदनगर: गेल्या दोन दिवसांपासून पारनेरमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पारनेरमधील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे.
'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, पारनेरमधील शिवसेनेचे पाच नगरसेवक परत पाठवा, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना दिला आहे. परंतु, हा निरोप शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत फोन करून अजित दादांना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर अजित पवार यांच्याकडून अद्याप आपणाला असा काहीही निरोप आलेला नाही, अशी माहिती निलेश लंके यांनी 'लोकमत'ला दिली आहे.
"महाराष्ट्रात मुख्यमंत्रीच नाही, जो आहे तो 'मातोश्री'पुरता"
नेपाळी पंतप्रधानांची खुर्ची वाचवण्यासाठी चीन लागला कामाला; राजकीय हालचालींना वेग
नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी बारामतीत जाऊन अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यामुळे पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व वाढले असून शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मोठा धक्का मानला जात आहे. नगराध्यक्षपदावरून नगरसेवक आणि विजय औटी यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावामुळे शिवसेना नगरसेवकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्याचं बोललं जातंय. मात्र, तालुक्यासोबतच शहरातही वर्चस्व वाढवण्यासाठी निलेश लंके यांनी ही खेळी केल्याचीही कुजबूज आहे.
नीलेश लंके हे अजित पवार यांचे विश्वासू मानले जातात. त्यांना उमेदवारी देण्यापासून निवडून आणण्यात त्यांची मोठी भूमिका होती. खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार हेही लंके यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिवसेनेतील फोडाफोडी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने मान्य केल्याचे सांगण्यात येत आहे. नगरपंचायतीत १७ नगरसेवक आहेत. अपक्ष निवडून आलेल्या वर्षा नगरे यांना नगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. मात्र शिवसेनेच्या पाच नगसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक उरलेत. त्यामुळे पुढची निवडणूक त्यांच्यासाठी कठीण असणार आहे.