राजकीय पक्षांतील संवाद हरपला!; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:29 AM2024-07-12T06:29:34+5:302024-07-12T06:29:45+5:30
एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे.
मुंबई : सध्या आपल्या संसदेचे आणि विधिमंडळांचे कामकाज सुरळीत चाललेले नाही हे उघड आहे. लोकशाहीच्या मंदिरात कामकाजात व्यत्यय आणला जातो. अशांतता पसरवून सभागृहाचे पावित्र्य भंग केले जाते. याचे कारण पक्षापक्षातील संवाद हरपला असल्याची खंत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गुरुवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त विधानसभा सभागृहात विधिमंडळ सदस्यांसाठी उपराष्ट्रपती धनखड यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपराष्ट्रपती म्हणाले, पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि भाषणाची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. राष्ट्र अखंडपणे, सुरळीतपणे आणि वेगाने तेव्हाच प्रगती करते जेव्हा त्याच्या विधिमंडळ, न्यायपालिका आणि कार्यपालिका या तीन शाखा आपापल्या क्षेत्रात कार्य करतात. सत्तेच्या पृथक्करणाच्या सिद्धांताचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. एका संस्थेने दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी केल्याने गोष्टी बिघडण्याची शक्यता असते. विधिमंडळाने हा नाजूक समतोल राखला पाहिजे.
महाराष्ट्र उर्जास्रोत
महाराष्ट्र हे इतरांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या राज्याला आहे. शेती, प्रशासन, उत्तरदायित्त्वाची जाणीव ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच देशाला नव्या उंचीवर पोहोचविण्यात महाराष्ट्राची भूमिका ही खऱ्या अर्थाने उर्जास्रोताची असल्याचे उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले.
नागरिकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य द्या
सामान्य नागरिक त्यांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ म्हणून विधिमंडळाकडे पाहतात. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांनी या सभागृहाची उच्च परंपरा जपून आणि संसदीय परंपरांचे पालन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी आमदारांना केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्य उपस्थित होते.