अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुंबई काँग्रेसमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 05:18 AM2019-07-16T05:18:26+5:302019-07-16T05:18:47+5:30

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजीनामा सत्रात मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

Confusion in Mumbai Congress from selection of President | अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुंबई काँग्रेसमध्ये संभ्रम

अध्यक्षपदाच्या निवडीवरून मुंबई काँग्रेसमध्ये संभ्रम

Next

मुंबई : लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या राजीनामा सत्रात मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका आणि पक्षांतर्गत लाथाळ्या यामुळे देवरा यांच्या जागी कोणाची वर्णी लावायची यावरून काँग्रेसमध्ये अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीतील वरिष्ठ नेते मुंबईत येणार असून मुंबई अध्यक्ष पदाबाबत चर्चा होणार असल्याचे समजते. सध्या अध्यक्ष पदासाठी आमदार भाई जगताप, संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह यांच्या नावांची चर्चा आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर अनेक प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि मुंबई अध्यक्ष देवरा यांनीदेखील राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर अध्यक्ष पद रिकामे असल्याने या ठिकाणी कोणाची वर्णी लागते याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी बाळासाहेब थोरात यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, अंतर्गत लाथाळ्यांमुळे प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईचा तिढा सुटलेला नाही. विशेष म्हणजे पक्षश्रेष्ठीसुद्धा या साºया प्रकरणी चाचपडत आहेत.
मुंबईचे काय करायचे यावर पक्षनेतृत्वही संभ्रमात असल्याची भावना काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखविली. देवरा यांनी मांडलेला सामूहिक नेतृत्वाचा प्रस्ताव स्वीकारत नवीन प्रयोग करायचा की एकाच नावाची घोषणा करायची याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रम आहे. शिवाय, नव्या अध्यक्षाच्या निवडीने पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी उफाळून तर येणार नाही ना? अशी भीती वरिष्ठ स्तरावरून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अध्यक्ष पदासाठी सध्या अनेक नावांची चर्चा आहे. आमदार भाई जगताप यांचे नाव आघाडीवर असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे. तसेच मिलिंद देवरा यांच्यापूर्वी मुंबई अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे संजय निरुपम हेदेखील अध्यक्ष पद मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. तर, कृपाशंकर सिंह हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अधूनमधून झडत असते. उत्तर भारतीय समाजातील त्यांचे स्थान आणि राजकीय कौशल्य लक्षात घेता त्यांच्याकडेच अध्यक्ष पद सोपविण्याबाबतही गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.
गुरुवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत दौºयावर आहेत. या वेळी मुंबई अध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिल्ली गाठली. या वेळी त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. या बैठकीत त्यांनी मुंबई प्रदेशाध्यक्षाबाबतही चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Confusion in Mumbai Congress from selection of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.