काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षवाद्यांना चुकीच्या बदलत्या धोरणाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:15 AM2019-05-27T06:15:34+5:302019-05-27T06:15:45+5:30
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर झालेल्या दारुण पराभवाला पक्षाची बदलती धोरणे कारणीभूत आहेत, असा आरोप मुस्लीम विचारवंत आणि इल्म-व-हुनर फाउंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती मंजूर जियाई यांनी केला आहे.
मुंबई : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवर झालेल्या दारुण पराभवाला पक्षाची बदलती धोरणे कारणीभूत आहेत, असा आरोप मुस्लीम विचारवंत आणि इल्म-व-हुनर फाउंडेशनचे अध्यक्ष मुफ्ती मंजूर जियाई यांनी केला आहे. जियाई म्हणाले, गेल्या ५ वर्षांत काँग्रेस पक्षाने विरोधी पक्षाची भूमिका आक्रमकपणे न मांडता कुचकामी धोरण अवलंबले. शिवाय धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्मांधतेलाच अधिक खतपाणी घातले. समविचारी प्रादेशिक पक्षांना जाणीवपूर्वक आघाडीत सामील करून घेतले नाही. त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला असून त्यासोबत धर्मनिरपेक्षवाद्यांनादेखील त्याचा फटका बसल्याचा दावा त्यांनी केला.
भविष्यात समविचारी प्रादेशिक पक्ष काँग्रेसला पर्याय म्हणून पुढे येतील, अशी भीती त्यांच्या काँग्रेसला वाटत असल्याने त्यांनी त्यांना आपल्यासोबत घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत असलेले अल्पसंख्याक नेतृत्व प्रचारात दिसले नाही. पक्षाची सर्व प्रचारयंत्रणा केवळ राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याभोवतीच केंद्रित करण्यात आली होती. यामुळे पक्षाचा पराभव झाल्याचे ते म्हणाले.
सेक्युलर आणि असंख्य समवैचारिक लोकांनी वेळीच काँग्रेस नेतृत्वाला याबाबत विविध माध्यमांतून पूर्वकल्पना दिली होती, मात्र त्याकडे काँग्रेस नेतृत्वाने पूर्णत: दुर्लक्ष केले आणि स्वत:च्या कोशात मश्गुल राहिले.
परिणामी त्याचा फटका त्यांच्या पक्षासह इतर समविचारी वर्गास भोगावा लागत आहे, अशी टीका मुफ्तींनी केली. काँग्रेसने पारंपरिक मतदारवर्गावर पकड कायम ठेवण्याचे प्रयत्न व संघटना मजबूत करण्याऐवजी सॉफ्ट
हिंदुत्व आणि हार्ड हिंदुत्व कार्ड खेळत बसले आणि इतर धार्मिक मुद्द्यांकडे वळून मुख्य वैचारिकतेला बगल दिली. या सर्व चुकीच्या राजकीय व्यूहरचनेमुळे काँग्रेसला अल्पसंख्याकांची मते मिळवण्यात अपयश आले व बहुजन वर्ग आणि मध्यमवर्गीय मतेदेखील मिळाली नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.