राफेल घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल !मुंबईत महामोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:08 AM2018-09-28T05:08:25+5:302018-09-28T05:08:45+5:30
राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला.
मुंबई - राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पदांचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला.
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह विविध काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 'राफेल खरेदीची चौकशी झालीच पाहिजे, पंतप्रधान इस्तीफा दो..' अशा घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. संजय निरुपम यांच्यासह अनेक मोर्चेक-यांनी तर 'मेरा पंतप्रधान चोर है' अशा आशयाचे टी-शर्ट घातले होते.
महालक्ष्मी रेसकोर्स येथून सुरू झालेला हा मोर्चा आॅगस्ट क्रांती मैदानावर पोहोचताच त्याचे सभेत रूपांतर झाले. काँग्रेस आघाडीच्या काळातील करारानुसार एका राफेलची किंमत ५५० कोटी होती. मोदी सरकारने एका विमानाची किंमत १६५० कोटी केली. या व्यवहारात गडबड आहे. एका विमानामागे ११०० कोटी कोणाच्या खिशात घातले जात आहेत, याचे उत्तर पंतप्रधान मोदी यांनी द्यावे अशी मागणी खर्गे यांनी केली.
पवारांचे 'ते' वैयक्तिक मत - खर्गे
राफेल प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणार नाही, असे खर्गे म्हणाले. शरद पवार यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेतूंबद्दल शंका वाटत नाही, असे विधान केले होते.