“मुंबईकरांवर अन्याय करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल”; आमदार निधीवरुन काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:05 PM2024-01-31T17:05:34+5:302024-01-31T17:07:59+5:30

Congress Vs State Govt: सरकार करत असलेला भेदभाव जनतेने आता लक्षात ठेवावा व मतपेटीतून चोख उत्तर द्यावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

congress atul londhe criticism on state govt over mla fund issue | “मुंबईकरांवर अन्याय करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल”; आमदार निधीवरुन काँग्रेसची टीका

“मुंबईकरांवर अन्याय करणाऱ्या सरकारला जनता धडा शिकवेल”; आमदार निधीवरुन काँग्रेसची टीका

Congress Vs State Govt: आमदारांच्या विकास निधीमध्ये केलेल्या भेदभावावरून आता आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या मुद्द्यावरून काँग्रेसनेराज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुंबईतील ३६ आमदारांपैकी सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात वाटली पण काँग्रेससह विरोधी पक्षांच्या १५ आमदारांपैकी एकालाही फुटकी कवडीही दिली नाही, अशी टीका करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला. आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी प्रत्येक आमदाराला निधी दिली जातो. या निधीचे समान वाटप करावे अशी अपेक्षा असते पण कधी सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना झुकते माप दिले तर तेही समजून घेतले असते पण विरोधकांना एक पैसाही द्यायचा नाही ही राजकीय प्रवृत्ती अत्यंत खालच्या पातळीची आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांनी पालक मंत्र्याकडे वेळोवेळी पत्र पाठवली तरीही त्यांच्याकडे लक्ष दिले गेले नाही पण सत्ताधारी भाजपा व शिंदे गटाच्या आमदारांना मात्र तातडीने निधी उपलब्ध करुन दिलेला आहे, असे लोंढे यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही. विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड झालेले आहेत. मुंबईतील केवळ सत्ताधारी पक्षांच्याच आमदारांना ५०० कोटी रुपयांची खैरात करणे व विरोधी पक्षांच्या एकाही आमदाराला एक फुटकी कवडीही न देणे हे नीच प्रकारचे राजकारण आहे, अशी टीका लोंढे यांनी केली. 

दरम्यान, सरकार आमदारांना विकासकामांसाठी निधी देतो म्हणजे काही उपकार करत नाही. जनतेचाच पैसा जनतेसाठी दिला जातो. विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी न देणे म्हणजे त्या मतदारसंघातील जनतेला विकासापासून वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. शिंदे-भाजपा सरकारने निधी वाटपात मोठा भेदभाव केलेला आहे. महाराष्ट्रातील राजकारण इतक्या खालच्या थराला गेले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आगामी निवडणुकीत मतदान करताना जनतेने शिंदे-भाजपा सरकार करत असलेला भेदभाव लक्षात ठेवावा व त्यांना मतपेटीतून चोख उत्तर द्यावे, असे आवाहन अतुल लोंढे यांनी केले आहे.

 

Web Title: congress atul londhe criticism on state govt over mla fund issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.