“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 05:36 PM2024-05-09T17:36:45+5:302024-05-09T17:38:14+5:30
Congress Bhalchandra Mungekar News: नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे, अशी टीका करण्यात आली आहे.
Congress Bhalchandra Mungekar News: नरेंद्र मोदी यांची धोरणे श्रीमंत धार्जिणी राहिलेली आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एनपीए ६६ लाख कोटी रुपये असून मोदी सरकाने मुठभर श्रीमंत लोकांची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केलेली आहेत. जनतेमध्ये राहुल गांधी व इंडिया आघाडीला पाठिंबा वाढत असल्याचे चित्र दिसताच नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांचा ‘शहजादे’ असा उल्लेख करुन बदनामी करत आहेत. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत अशी पाकिस्तानची इच्छा आहे हे नरेंद्र मोदींचे विधान बदनामी करणारे आहे. पाकिस्तानचे निमंत्रण नसतानाही नरेंद्र मोदी हे मात्र नवाज शरिफ यांच्या घरी अचानक जाऊन बिर्याणी खातात. पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने केली जात आहेत, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदींनी २० ते २२ उद्योगपतींचा फायदा केला. मात्र, देशातील लाखो लोकांना पैसे देऊ असे राहुल गांधी यांची भूमिका आहे. देशाची संपत्ती नरेंद्र मोदी हे श्रीमंताना वाटतात पण राहुल गांधी मात्र तोच पैसा गरिबांसाठी उपयोगात आणत आहेत, असे भालचंद्र मुणगेकर यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास एससी, एसटीचे आरक्षण काढून ते मुस्लीम समाजाला देणार हा मोदी-शाह यांचा आरोपही खोडसाळपणाचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.
राजकीय फायद्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदी काँग्रेसला बदनाम करत आहेत
संविधानाने दिलेल्या या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राम मंदिराला काँग्रेस बाबरी टाळे लावेल हा भाजपाचा आरोपही दिशाभूल करणारा व अपप्रचार आहे. प्रभूराम हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. पण राजकीय फायद्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदी काँग्रेसला बदनाम करत आहेत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत त्यांनी जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. अशा पद्धतीने धार्मिक द्वेष पसरवणे उच्चपदस्थ व्यक्तीला शोभत नाही. भाजपा ‘अब की बार ४०० पार’ म्हणत असले तरी ते शक्य नाही ‘अब की बार, मोदी सरकार तडीपार’, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
दरम्यान, अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान धादांत खोटे व बेजबाबदारपणाचे आहे. अंबानी-अदानी यांचे नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले संबंध जगजाहीर आहेत असे असताना राहुल गांधींकडे बोट करणे चुकीचे आहे. पंतप्रधान मोदी यांना तसे वाटत असेल तर त्यांनी खुशाल सीबीआय, ईडी कडून अदानी अंबानींची चौकशी करावी म्हणजे सत्य काय आहे ते जनतेसमोर येईल, असे आव्हान मुणगेकर यांनी दिले.