“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 05:00 PM2024-05-01T17:00:35+5:302024-05-01T17:01:35+5:30
Congress Bhushan Patil News: उत्तर मुंबई मतदारसंघात अनेक गोष्टी माझ्या जमेच्या बाजू आहेत, असे भूषण पाटील यांनी म्हटले आहे.
Congress Bhushan Patil News:काँग्रेसमध्ये आताच्या घडीला मानापमान नाट्य आणि नाराजी सुरू आहे. यातच काँग्रेसने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाकडून पीयूष गोयल रिंगणात आहेत. त्यामुळे भूषण पाटील आणि पीयूष गोयल यांच्यात ही लढत होताना पाहायला मिळणार आहे. पीयूष गोयल यांनी प्रचाराचा धुरळा उडवलेला दिसत आहे. तर भूषण पाटील लवकरच उमेदवारी अर्ज भरून प्रचारावर भर देणार असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर भूषण पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करतो की, त्यांनी एका स्थानिक उमेदवाराला संधी दिली. पीयूष गोयल हायप्रोफाइल नेते आहेत. केंद्रीय मंत्री राहिलेले आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांचे काम चांगले होते. त्यांना बाजूला केले आणि पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली. माझा या भागात चांगला संपर्क आहे. अनेक ठिकाणी दररोज जात असतो. लोकांना भेटत असतो, असे भूषण पाटील यांनी सांगितले.
वरिष्ठांची चर्चा करून प्रचारसभा, स्टार प्रचारक यांवर लक्ष केंद्रीत करणार
प्रचाराचे मुद्दे म्हणाले, तर अनेक मुद्दे आहेत. स्थानिक मुद्दे आहेत, महागाईचा मुद्दा आहे. रेल्वेची समस्या आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. पर्यावरण, वन विभाग असे अनेक मुद्दे आहेत. हे तर स्थानिक मुद्दे झाले. मात्र, देशावर अनेक मुद्दे आहेत. गेल्या १० वर्षांत चांगले काम झालेले नाही. महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई आहे. हे प्रश्न लोकांना नवीन नाहीत. परंतु, याच माझ्या जमेच्या गोष्टी आहेत. हे सगळे मुद्दे मांडत आहे. प्रचाराला सुरुवात केली आहे. वरिष्ठांची चर्चा करून प्रचारसभा, स्टार प्रचारक यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. लवकरच उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे भूषण पाटील म्हणाले.
दरम्यान, मुंबईतील सर्व जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. भूषण पाटील यांच्या नावाची घोषणा व्हायला झालेला उशीर आणि पीयूष गोयल यांनी प्रचारात घेतलेली आघाडी याला जनता कसा प्रतिसाद देणार, कोणाच्या बाजूने जनता कौल देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.