पेंग्विन देखभालीवर १५ कोटी खर्च करण्यास काँग्रेस-भाजपचा विरोध; शिवसेनेची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:09 PM2021-09-06T20:09:41+5:302021-09-06T20:11:31+5:30
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सन २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले.
मुंबई - कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाचा आर्थिक भार आणि उत्पन्नात घट यामुळे मुंबई महापालिकेचे आर्थिक गणित बिघडले आहेत. या परिस्थितीत राणी बागेतील पेंग्विनच्या देखभालीसाठी तीन वर्षांत १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मात्र सर्वत्र आर्थिक मंदी असताना या कंत्राटाच्या किंमतीमध्ये ५० टक्के वाढ कशी ? असा सवाल उपस्थित करीत हे कंत्राट रद्द करण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात सन २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष व पेंग्विन खरेदीसाठी एकूण २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर तीन वर्षांच्या देखभालीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी १५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. मात्र हा खर्च अवाजवी असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
पेंग्विन पक्षांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी राणीबागेत तज्ञ पशु वैद्यकीय अधिकारी आहेत. तर पेंग्विन कक्षाच्या देखभालीसाठी महापालिकेचे अभियंता व कर्मचारी उपलब्ध आहेत. अशावेळी केवळ ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठीच या निविदा काढण्यात आल्या असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा आणि भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
म्हणजे पांढरा हत्ती पोसणे
कोविडच्या महामारीमुळे पाच हजार कोटी खर्च, लॉकडाऊन व आर्थिक मंदीमुळे उत्पन्नात घट, यापूर्वीच हाती घेतलेले मोठे प्रकल्प आदींमुळे पालिकेचा आर्थिक ताळेबंद बिघडला आहे. त्यामुळ रस्ता, उद्याने यांसारख्या कित्येक विकासकामांना कात्री लावावी लागत आहे. अशावेळी पेंग्विन पक्षी व त्यांच्या कक्षाच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपये खर्च करणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. म्हणूनच हे कंत्राट निविदा रद्द करून हे काम खात्यांतर्गत उपलब्ध असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून करून घ्यावे, असे त्यांनी सुचवले आहे.
दररोज एका पेंग्विनचा खर्च - २० हजार रुपये
एका दिवसाचा सात पेंग्विनवरील खर्च - दीड लाख
दरमहा सात पेंग्विनचा खर्च - ४२ लाख
वार्षिक खर्च - पाच कोटी
तीन वर्षांसाठी - १५ कोटी