‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
By दीपक भातुसे | Published: June 8, 2024 07:23 AM2024-06-08T07:23:05+5:302024-06-08T07:23:57+5:30
लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे. आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस हा आता मोठा भाऊ आहे, विधानसभेला काँग्रेसला १५० जागा हव्या आहेत, या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अंतर्गत संघर्ष होण्याची चिन्हे असतानाच काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यात हस्तक्षेप केला आहे.
महाविकास आघाडीत कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. महाविकास आघाडी लोकसभा निवडणूक एकत्र लढली असून पुढील विधानसभा निवडणुकीतही एकत्र लढायचे आहे, असे विधान करीत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाच्या बैठकीत पटोले यांनाच कानपिचक्या दिल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३ जागा जिंकल्यानंतर पटोलेंनी आघाडीत आक्रमक भूमिका घेण्याच्या केलेल्या प्रयत्नातील हवाच चेन्नीथला यांनी या बैठकीत काढल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित खासदारांची बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेन्नीथला म्हणाले की, आघाडीचे राजकारण सोपे नसते; पण सर्व घटक पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडी मजबूत केली व आपण निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपच्या हुकूमशाही सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी ऐक्य केले आणि जनतेनेही आघाडीवर विश्वास व्यक्त करीत कौल दिला आहे.
लोकसभेची लढाई आपण जिंकली आहे. आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून असाच लढा देऊ व विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणू, असा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केला. बैठकीला चेन्नीथला यांच्यासह नाना पटोले, सरचिटणीस मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गटनेते सतेज पाटील, शाहू महाराज, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, आदी उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यात महाविकास आघाडीची मोट बांधून त्यात ऐक्य कायम ठेवण्यामध्ये काँग्रेससह पवार आणि ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती.
काँग्रेसच्या नेत्यांनी शुक्रवारी सकाळी सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
भेटीला गेलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकुल वासनिक, विजय वडेट्टीवार, खासदार वर्षा गायकवाड आदींचा समावेश होता.
विशाल पाटीलही उपस्थित
काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीला सांगलीचे अपक्ष आमदार विशाल पाटीलही उपस्थित होते. पाटील यांनी बंडखोरी करून सांगलीतून मविआच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती. विजयानंतर गुरुवारी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ते भेटले आणि त्यांनी काँग्रेसबरोबर असल्याचे पत्रही दिले. त्यामुळे या बैठकीला त्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.