बालेकिल्ल्यात उमेदवारासाठी काँग्रेसची वणवण; एमआयएम फॅक्टरबाबत मात्र उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 01:03 AM2019-02-10T01:03:56+5:302019-02-10T01:04:15+5:30

ग्लॅमरस मतदारसंघ अशी ‘उत्तर मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची ओळख. हायप्रोफाईल सेलिब्रेटी, सिनेतारे तारकांचा वावर असणारा हा मतदारसंघ. शिवाय, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अभिनेते दिवंगत सुनिल दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत राहीला.

Congress declaration for the candidate in the citadel; But curiosity about the MIM factor | बालेकिल्ल्यात उमेदवारासाठी काँग्रेसची वणवण; एमआयएम फॅक्टरबाबत मात्र उत्सुकता

बालेकिल्ल्यात उमेदवारासाठी काँग्रेसची वणवण; एमआयएम फॅक्टरबाबत मात्र उत्सुकता

Next

- गौरीशंकर घाळे

ग्लॅमरस मतदारसंघ अशी ‘उत्तर मध्य मुंबई’ लोकसभा मतदारसंघाची ओळख. हायप्रोफाईल सेलिब्रेटी, सिनेतारे तारकांचा वावर असणारा हा मतदारसंघ. शिवाय, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि अभिनेते दिवंगत सुनिल दत्त यांच्यामुळे हा मतदारसंघ कायम चर्चेत राहीला. बॉलिवूडमधून राजकारणात आलेल्या सुनील दत्त यांनी मुरलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे मतदारसंघ बांधून ठेवला होता. त्यांची आठवण आजही राजकीय वर्तुळातील कार्यकर्ते देतात. सुनील दत्त यांच्या पश्चात त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांच्याकडे त्यांचा राजकीय वारसा आला. त्यांनी खासदारकीही भूषवली. २०१४ च्या मोदी लाटेतही ‘उत्तर मध्य-मुंबई’ मतदारसंघ काँग्रेस राखेल, अशी चर्चा तेंव्हा होती. तरीही भाजपाच्या पूनम महाजन यांनी तब्बल १ लाख ८६ हजारांचे मताधिक्य घेत विजयाची नोंद केली. २०१४ च्या पराभवानंतर प्रिया दत्त यांनी जणू राजकीय संन्यासच घेतला होता.
मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडेही त्यांनी पाठ फिरवली. दरम्यानच्या काळात तीनवेळा राहुल गांधींचा मुंबई दौरा झाला. यातील एकाही दौऱ्यात प्रिया दत्त यांनी राहुल गांधींना भेटण्याचीही तसदी घेतली नसल्याचा दावा त्यांचे विरोधक करतात.
मतदारसंघातील एक मोठा वर्ग आजही दत्त यांची समजूत काढावी, अशी मागणी करीत आहे. जोडीलाच राज बब्बर, नगमा, मोहम्मद अझहरूद्दीन अशी सेलिब्रेटी नावेही मधल्या काळात पुढे गेली. याशिवाय, स्थानिक आमदार नसीम खान आणि बाबा सिद्दीकी यांची नावेही पुढे करण्यात आली. नसीम खान यांना खासदारकीत रस नाही. तर, बाबा सिद्दीकी, अझहर यांच्या उमेदवारीने निवडणूक थेट हिंदू-मुसलमान मुद्दयावर जाईल, अशी भीती आहे. एकेकाळच्या बालेकिल्ल्यात उमेदवारच नाही, अशी काँग्रेसची स्थिती झाली आहे. चांगला उमेदवार दिला, तरच काँग्रेस लढत देऊ शकेल अन्यथा काही खरे नाही,
अशी खंत काँग्रेस कार्यकर्तेच व्यक्त करतात.
तिकडे भाजपाच्या गोटातही सारे आलबेल आहे, अशी स्थिती नाही. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात पूनम महाजन यांची कामगिरी समाधानकारक नसून त्या डेंजर झोनमध्ये असल्याचे वृत्त आले होते. शिवाय, भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदामुळे पूनम महाजन दौºयावरच जास्त असायच्या. आशिष शेलार आणि पराग अळवणी या दोघांचे कामे आणि जनसंपर्क हाच इथल्या भाजपाचा आधार आहे. स्थानिक संघटन, राष्ट्रीय पातळीवर वाहणारे राजकीय वारे यावरच महाजनांची खासदारकी अवलंबून असल्याचे चित्र आहे.
भाजपा- शिवसेना युती होईल, असे सध्या वातावरण आहे.

सध्याची परिस्थिती
मतदारसंघापेक्षा पूनम महाजन वरळी येथील आपल्या निवासस्थानी अथवा भाजयुमोच्या निमित्ताने देशभरातील दौºयावरच असायच्या, अशी स्थानिकांची तक्रार.
मागील निवडणुकीच्या तुलनेत मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी उतरण्याची चिन्हे. वाढ काँग्रेसच्या पथ्यावर पडेल असा दावा.
एमआयएम आणि भारिपची बहुजन वंचित आघाडी काँग्रेसला डोकेदुखी ठरू शकते. आंबेडकरांना आघाडीत सामावून घेतल्यास काँग्रेसला फायदा.
सपा-बसपाच्या आघाडीचा फटका इथल्या उमेदवाराला बसू शकतो. चांगला उमेदवार दिल्यास किमान ३० ते ४० हजार मतांचा फरक पडू शकतो.

ठाकरे घराण्याशी
असलेले संबंधही पूनम यांच्या पथ्यावर पडणारे आहेत. युती झाली नाही, तर माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत शिवसेनेचे उमेदवार असू शकतात. सहापैकी तीन आमदार शिवसेनेचे, दोन भाजपा आणिं एक काँग्रेसचा अशी विधानसभेची स्थिती आहे. मात्र, सेना-भाजपातील मतांचे अंतर पाहिल्यास भाजपाचे मताधिक्य मोठे आहे. त्यामुळे एकट्या शिवसेनेचा इथे निभाव लागेल, अशी स्थिती नाही.

Web Title: Congress declaration for the candidate in the citadel; But curiosity about the MIM factor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.