शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 02:38 AM2019-10-31T02:38:08+5:302019-10-31T02:38:20+5:30
सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे.
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभरात कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, ही माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी दिली.
पक्षाच्या नेत्यांची निवडणूक निकालानंतर पहिली बैठक मुंबईत झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत निकालाच्या अनुषंगाने चर्चा
झाली. जो निकाल आला त्यापेक्षा अधिक चांगला निकाल येऊ शकला असता असेही मत काही सदस्यांनी व्यक्त केले. तर यशोमती ठाकूर यांनी अनेक मतदारसंघात नेत्यांनी हवी ती मदत पोहोचती केली नाही, असा थेट आक्षेप घेतला. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आपण कोणाकोणाला मदत केली याची यादीच देतो असे सांगितले. मात्र पक्षाचे प्रभारी मल्लीकार्जून खरगे यांनी ही चर्चा तेथेच थांबवली. कोणी काय केले यापेक्षा आता पुढे काय करायचे यावर चर्चा करा, असेही ते म्हणाले. अनेक नेते खरगे यांच्यावर बोलायला आले होते पण त्यांनीच विषय थांबवल्याने अनेकांनी गप्प रहाणे पसंत केल्याचे एक नेता म्हणाला.
बैठकीला माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल
वासनिक, खा. बाळू धानोरकर, रजनीताई पाटील, संजय दत्त, डॉ. नितीन राऊत, आ. यशोमती ठाकूर, मुझμफर हुसेन, आ. डॉ. विश्वजीत
कदम, माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी. एम. संदीप, चेला वामशी रेड्डी आदी उपस्थित होते.
सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्यातील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. बेकारी वाढली आहे. त्याविरोधात अखिल
भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीन देशभरात ५ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. आज विधानसभा गटनेता निवड उद्या गुरुवारी टिळक भवन दादर मुंबई येथे काँग्रेसच्या नवनिर्वाचीत
आमदारांची बैठक आ. बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे. त्यात पक्षाचा विधानसभेचा गटनेता आणि
विधिमंडळ पक्ष नेता निवडण्यावर निर्णय होणे अपेक्षीत आहे, मात्र या निर्णयाचा अधिकार पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल असा ठराव मंजूर करुन बैठक संपेल, असेही तो नेता म्हणाला.