“छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 15:13 IST2025-02-19T15:11:07+5:302025-02-19T15:13:12+5:30

Congress Harshvardhan Sapkal News: राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

congress harshvardhan sapkal said we will move forward with the teachings and inspiration of chhatrapati shivaji maharaj | “छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

“छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, प्रेरणेने वाटचाल करणार”; हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार

Congress Harshvardhan Sapkal News:छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास शिवाजी महाराजांनी धरली होती. बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही महाराजांची शिकवण आहे, ती शिकवण त्यांची प्रेरणा घेऊनच आम्ही वाटचाल करू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पत्रकार परिषदेत बोलताना पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात अनेक प्रवृत्ती काम करत होत्या, त्यांच्या राज्याभिषेकालाही विरोध केला होता, त्याच प्रवृत्ती आजही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची लढाई राज्यव्यवस्था व तत्कालीन अर्थव्यवस्थेविरोधातही होती तशाच पद्धतीने आज सत्ता ही मूठभर लोकांच्यासाठी राबवली जात आहे. धर्मव्यवस्थेतही मूठभर लोक आम्हीच सर्वेसर्वा असे माननारे आहेत, या प्रवृत्तींच्या विरोधात आम्हाला लढावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे व त्यांनी दिलेल्या सामाजिक दर्शनाच्या माध्यमातूनच वाटचाल करू, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार

गड किल्याच्या विषयावर बोलताना सपकाळ म्हणाले की, गड किल्ले आपल्या अस्मितेचे विषय आहेत, सत्तेत येण्यासाठी लाडकी बहिण योजनेकडे वारेमाप पैसा वळवला जाऊ शकतो तर आपल्याला प्रेरणा देणाऱ्या गड किल्ल्याकडेही पहावे, त्याचे खाजगीकरण करु नये, पर्यटकांच्यासाठी म्हणून गड, किल्ल्यावर बार, पब सुरू करू नयेत. राज्यातील सरकार म्हणजे दिल्लीत मुजरा व गल्लीत गोंधळ असा प्रकार आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

दरम्यान,  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे महाराष्ट्र धर्म जागवावा ही शपथ घेण्याचा दिवस आहे. आपण सर्व जाती धर्माचे लोक एक आहोत, हे आपले स्पिरीट आहे, आपला संस्कार आहे. या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ चित्रपट सरकारने करमुक्त करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली. 

 

Web Title: congress harshvardhan sapkal said we will move forward with the teachings and inspiration of chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.