“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:56 IST2025-04-23T17:55:19+5:302025-04-23T17:56:47+5:30
Congress Harshwardhan Sapkal On Pahalgam Terror Attack: एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
Congress Harshwardhan Sapkal On Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे.
अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे
पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. अनेक पर्यटक जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांचे नाव, धर्म विचारून त्यांना गोळ्या झाडल्याचे समोर आल्याने देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, यापैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत.