आमदार व्हायचंय? विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मागवले इच्छुकांचे अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 06:28 AM2024-07-08T06:28:47+5:302024-07-08T06:28:59+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
मुंबई : राज्यात ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती पक्षनिधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयात पाठवावेत, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी केले आहे.
विधानसभा उमेदवारीचे अर्ज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर मुंबई येथे तसेच सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. या अर्जासोबत पक्षनिधी म्हणून सर्वसाधारण वर्गातील उमेदवारांसाठी २० हजार रुपये तसेच अनुसूचित जाती, जमाती आणि महिला इच्छुक उमेदवारांना १० हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
मतदार याद्या अद्ययावत करण्यावर भर द्या
२५ जून ते २४ जुलै २०२४ या कालावधीत मतदारयाद्यांचे पुनरीक्षण करण्यात येणार आहे. आपल्या विधानसभा मतदारसंघातील मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदारांची नावे यादीत आहेत का? ते पाहावे.नसलेली नावे यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, अशी सूचना काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.