भाजपा अन् शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ; काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:13 PM2022-07-14T19:13:30+5:302022-07-14T19:17:28+5:30
काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर टीका केली आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बरेच दिवस उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. याच मुद्द्यावरुन आता शिंदे सरकारवर टीका केली जात आहे. नुकतंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यात पूरामुळे लोकांचे जीव जात आहे, कोरोना आहे पण सरकार अस्तित्वात नाही, असा टोला लगावला. त्यानंतर आता काँग्रेसनेही शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रात भाजप प्रणित शिंदे सरकार येऊन १५ दिवस झाले पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. उपमुख्यमंत्र्यांनाही खाते दिले नाही. राज्यात पूरस्थितीमुळे १०० हून अधिक बळी गेले आहेत, असं अतुल लोंढे म्हणाले. तसेच शिंदे-फडणवीसांच्या सत्तापिपासू वृत्तीमुळे सरकार स्थापन झाले असले तरी प्रत्यक्षात शासन व प्रशासन राज्यात अस्तित्वातच नसल्याने महाराष्ट्र अनाथ झाला आहे, अशी टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात भाजप प्रणित शिंदे सरकार येऊन १५ दिवस झाले पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार नाही. उपमुख्यमंत्र्यांनाही खाते दिले नाही. राज्यात पूरस्थितीमुळे १०० हून अधिक बळी गेले आहेत. भाजप आणि शिंदेच्या सत्तापिपासू वृत्तीने महाराष्ट्राची अवस्था अनाथ लेकरासाठी केली आहे.
— Atul Londhe (@atullondhe) July 14, 2022
राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वदूर पाऊस झाला असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत जनतेला तातडीच्या मदतीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्री कॅमेरा, अॅक्शनमध्ये अडकून व्हिडिओजीवी झाल्याचे दिसत आहे, असा टोलाही अतुल लोंढे यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच या सरकारने राज्यातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाताळण्याऐवजी मुंबईकरांच्या जीवावर बेतणाऱ्या आरे कारशेडचा निर्णय घेतला, असल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की मारामाऱ्या होतील. या माऱ्यामाऱ्या वैचारिक असतील. आजकाल सगळे सत्तेचे भुकेले झालेले आहेत. त्यामुळेच हे ५० आमदार एकत्र आले आहेत. मुंबईत सुरू असलेलं यांचं शक्तीप्रदर्शन फक्त मंत्रिपदासाठीच आहे. आता ५० लोकांमध्ये १३ मंत्रिपदं दिली तर बाकिच्यांचं आहे. तिकडे भाजपाचे ११६ जण आहेत. मग ते काय महत्वाची खाती सोडणार आहेत का? मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजी निर्माण होईल आणि फुटलेल्या आमदारांना पश्चाताप होईल, असा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.