विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ मंत्र्याच्या नावाची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 12:51 PM2021-02-15T12:51:49+5:302021-02-15T12:53:44+5:30
maharashtra assembly speaker : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी (K C Padvi) यांच्या नावाची जोरदार चर्चा
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले (Nana Patole) यांची नियुक्ती झाल्यानंतर आता राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या खात्यात असल्यानं त्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचाच चेहरा पाहायला मिळेल असं बोललं जात आहे. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी (K C Padvi) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. (K C Padvi On Maharahstra Assembly Speaker)
के.सी.पाडवी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेतील कामकाजाचा चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे के.सी.पाडवी यांचं नाव काँग्रेसकडून सुचवलं जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. के.सी पाडवी यांना याबाबत विचारण्यात आलं असता राजकारणात अशा प्रकारच्या चर्चा होत असतात, असं वक्तव्य केलं आहे.
"विधानसभा अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची चर्चा आहे. पण या चर्चेआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीही माझ्या नावाची चर्चा होती. त्यामुळे राजकारणात अशा चर्चा होतच असतात. पण अशा परिस्थितीत आपण न थांबता पक्षासाठी काम करत राहणं महत्वाचं आहे. मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणं हे माझं काम आहे", असं के.सी.पाडवी म्हणाले. ते नंदुरबारमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
कोण आहेत के.सी.पाडवी? (k c padvi profile)
राज्यातील पहिला क्रमांचा मतदारसंघ म्हणजेच अक्कलकुवा अक्राणी मतदार संघ. या मतदार संघाचे १९९५ सालापासून आमदार के.सी.पाडवी प्रतिनिधीत्व करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपने अनेकदा या मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलेलं नाही. 1995 साली केसी पाडवी यांनी अक्राणी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात विजयी झाले. त्यानंतर या मतदारसंघाचे चित्र पालटले. तेव्हापासून या मतदारसंघात त्यांना कुणी पराभूत करु शकले नाही.
के.सी.पाडवी यांच्याकडे सध्या आदिवासी विकास विभागाची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षातील ते एक अनुभवी नेते असून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पाडवी यांच्याकडे काँग्रेसने आदिवासी विकास मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.