महाराष्ट्र पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा; पटोलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 02:51 PM2023-11-20T14:51:45+5:302023-11-20T15:01:25+5:30
नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच दोन समाजांमध्ये वाट पेटवण्याचं कारस्थान सरकारकडूनच केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
मुंबई - आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. "महाराष्ट्र पेटवण्याचं काम सरकारकडून सुरू आहे. सरकारने आरक्षणाबाबत जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. आम्हाला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा, आम्हाला सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र हवा आहे. मात्र भाजपने जो महाराष्ट्र पेटवला आहे, तो आम्हाला नकोय. त्यामुळे या सगळ्या विषयात राज्यपालांनी तातडीने हस्तक्षेप करायला हवा. फक्त छगन भुजबळच नाही, तर संपूर्ण सरकार या वादात सहभागी आहे. महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती असूनही दुष्काळ जाहीर केला जात नाही. फक्त मंत्र्यांचे तालुके दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केले जात आहेत. अशा पद्धतीने राज्य चालू शकत नाही. १ सप्टेंबरपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू झाले आहेत, त्यावरून पाऊस किती कमी पडलाय, याचा अंदाज येतो. मात्र याकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं, यासाठी जाणूनबुजून वेगळा वाद निर्माण केला जात आहे," असा आरोप पटोले यांनी केला आहे.
सरकारवर टीकास्त्र सोडताना नाना पटोले म्हणाले की, "सरकार महागाईवर बोलायला तयार नाही. नोकरभरतीबद्दलही संभ्रम आहे. परंतु माध्यमांचं सगळं लक्ष मराठा आणि ओबीसी वादाकडे वळवायचं आणि सरकारने फक्त गंमत पाहावी, असा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. सरकारच्या या भूमिकेला आमचा विरोध आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशाने मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी लाठीचार्ज झाला होता आणि म्हणूनच फडणवीसांनी माफीही मागितली होती."
'शासन आपल्या दारी' कार्यक्रमावरही साधला निशाणा
"खोक्यांचं आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या सरकारची नियत खराब आहे. राज्याचे एक उपमुख्यमंत्री नाराज होऊन घरी बसतात आणि नंतर एका रात्रीत त्यांचा डेंग्यू बरा होतो व ते दिल्लीत जाऊन बसतात. तिथे ते तक्रार करतात की माझ्या फाईल्स क्लिअर होत नाहीत. महाराष्ट्र सरकार कसं सुरू आहे, याचं हे उदाहरण आहे. सरकार आपल्या दारी, या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एका माणसाला संपूर्ण राज्यातील कार्यक्रमांचं कंत्राट दिलं जात आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी साडेतीन कोटी रुपये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च केले जात आहेत. एकीकडे गावखेड्यात रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशी परिस्थिती आहे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी सुरू आहे," अशा शब्दांत नाना पटोले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.