भाजपा नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात चर्चा, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 04:30 PM2022-05-15T16:30:12+5:302022-05-15T16:30:25+5:30
भाजपाचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
राजस्थानच्या उदयपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात २०२४ ची रणनीती आखली जात आहे. या चिंतन शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत पक्षाची धोरणं, भविष्यातील योजना, मुद्दे यावर विचारविनिमय करण्यात आला आहे.
काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे अशी मागणी यावेळी काही नेत्यांनी केली आहे. तसेच सक्रिय असणाऱ्या नेत्याकडेच काँग्रसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच या शिबिरामध्ये भाजपाला कसे उत्तर द्यायचे, याबाबतही चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
भाजपाचा उघड ध्रुवीकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्याला कसं उत्तर द्यायचं यावर चिंतन शिबिरात चर्चा झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. भाजपा स्वतः पुढे न येता कधी नट्यांना, तर कधी राज ठाकरेंना पुढे करते. भाजपाकडून लोकांना चिथावण्याचे प्रयत्न चालू आहेत. ही भाजपची रणनिती असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. कायद्याचा धाक दाखवून अशा लोकांना सरळ केले पाहिजे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
संसदीय मंडळ स्थापन करण्याची मागणी-
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, G23 नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या स्थापनेची मागणी केली आहे. दरम्यान, आज(रविवारी) उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिराचा तिसरा आणि शेवटचा दिवस. या चिंतन शिबिरात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत.
संघटना मजबूत करण्यासाठी विचारमंथन-
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, प्रदेश युनिट अध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि इतर अनेक वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत चिंतन शिबिरात आतापर्यंत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटना मजबूत करण्यासाठी विचारमंथन झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.