'टीका नाही, मी मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला होता'; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 04:19 PM2020-05-18T16:19:50+5:302020-05-18T16:19:58+5:30
मी उद्धव ठाकरेंवर टीका नाही, तर त्यांना सल्ला दिला होता, असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.
मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पहिल्यांदाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३० हजारांच्या वर पोहचली आहे तर १ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे नोकरवर्ग महामारीच्या संकटाचा सामना करत आहे पण दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं दिसून येत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र मी उद्धव ठाकरेंवर टीका नाही, तर त्यांना सल्ला दिला होता, असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंवर टीका केली नव्हती, तर सल्ला दिला होता. मात्र भाजपा महाविकास आघाडीत विसंगती असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं सरकार प्रभावीपणे काम करत आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मराठी वृत्तावाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
कोरोनाच्या संकटकाळात काही भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नियुक्तीसाठी रखडले आहेत. तर काही अधिकाऱ्यांना दोन-दोन कामं दिली आहेत. या अधिकाऱ्यांची योग्य जागी नियुक्ती करणे हे मुख्यमंत्र्यांचे पहिलं काम आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले होते. तसेच अधिकाऱ्यांची योग्यता आणि अनुभव लक्षात घेऊन त्यांना योग्यठिकाणी नियुक्त करावं त्यामुळे राज्याला लाभ होईल. राज्यात १० आयएएस अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्याकडे काहीच काम नाही असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं होतं.