वंचितच्या 'संविधान' महासभेचे काँग्रेसचे नेते राहुल गांधींना निमंत्रण, प्रकाश आंबेडकर यांनी दिली माहित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 07:11 PM2023-11-20T19:11:20+5:302023-11-20T19:11:51+5:30
Prakash Ambedkar: २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर केले. संविधान आणि कालानुरूप उपाय योजना यावर उहापोह करणारे दीर्घ भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर 'संविधान सन्मान महासभे' चे आयोजन केले आहे.
- श्रीकांत जाधव
मुंबई - २५ नोव्हेंबर, १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर केले. संविधान आणि कालानुरूप उपाय योजना यावर उहापोह करणारे दीर्घ भाषण केले. त्या भाषणाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीने संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर 'संविधान सन्मान महासभे' चे आयोजन केले आहे. या महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावे, असा निर्णय वंचित राज्य कार्यकारिणीत झाला असल्याची माहिती वंचितचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत या संविधान सन्मान महासभेबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरदेखील निशाना साधला. २०२४ च्या लोकसभा निवडणुका विकास, आर्थिक धोरण, परराष्ट्र धोरण इत्यादी मुद्द्यांवर लढवले जाईलच मात्र, आरएसएसचा अजेंडावरील ‘आमची’ हा शब्द फसवा आहे. त्यांच्या व्यवस्थेत बंधुत्व, स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य नाही. आरएसएसला वैदिक धर्मावर आधारित संविधान पाहिजे, आताचे भारतीय संविधान हे संतांच्या भूमिकेला आणि फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे आहे असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
धुळे, सटाणा यानंतर मुंबईत शिवाजी पार्क येथे महासभा होणार आहे. देशभरात संविधानिक संस्था, लोकशाही धोक्यात असतांना महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संविधानाच्या सन्मानार्थ महासभेचे आयोजन आहे. या संविधान सन्मान महासभेसाठी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना निमंत्रण द्यावे असा निर्णय आमच्या राज्य कार्यकारिणीत झाला आहे. त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रण पाठवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.