“लोकशाही, संविधान अन् देश हितासाठी असलेली इंडिया आघाडी कमजोर नाही मजबूत”: सचिन पायलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:33 IST2025-01-09T18:31:11+5:302025-01-09T18:33:26+5:30
Congress Sachin Pilot News: भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे, असा दावा सचिन पायलट यांनी केला आहे.

“लोकशाही, संविधान अन् देश हितासाठी असलेली इंडिया आघाडी कमजोर नाही मजबूत”: सचिन पायलट
Congress Sachin Pilot News: दिल्ली विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिल्लीत ७० जागांवर ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. इंडिया आघाडीचे घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष, काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहे. तर भाजपा जोरदार कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेस एका बाजूला पडली असून, इंडिया आघाडीत पक्षांनी आम आदमी पक्षाला समर्थन देण्यास सुरुवात केली आहे. समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेसनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. यानंतर आता इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत राष्ट्रीय राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. यातच इंडिया आघाडी मजबूत असल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केला आहे.
इंडिया आघाडी जी बनली ती लोकसभेच्या निवडणुकीसाठी होती. त्या आघाडीला तुम्ही सर्व निवडणुकीत जोडू नका. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत ‘आप’ आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर अधिक चांगला निकाल मिळवू शकले असते. इंडिया आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करत आहे. मात्र, केजरीवाल यांच्या सारख्या नेत्यांच्या विरोधात ज्या प्रकारे प्रचार केला जात आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी अमित शाह, पंतप्रधान मोदी हे तेथील सरकारला काम करू देत नाहीत. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने जर निवडणुका एकत्र लढवल्या असत्या तर आम्हाला आनंद झाल असता, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. यानंतर आता सचिन पायलट यांनी इंडिया आघाडीबाबत भाष्य केले आहे.
लोकशाही, संविधान अन् देश हितासाठी असलेली इंडिया आघाडी मजबूत
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सचिन पायलट म्हणाले की, लोकशाही, संविधान व देश हित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते, त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही, असे सचिन पायलट यांनी सांगितले.
दरम्यान, भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण वास्तविकता वेगळी आहे. जीडीपीमध्ये मोठी घसरण होत आहे. भारताला १० टक्के जीडीपीचे लक्ष्य ठेवून वाटचाल करावी लागेल, पण भाजपा सरकार कोणतेच खरे आकडे जाहीर करत नाही. भाजपा सरकारमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना जी वस्तुस्थिती आहे ती मांडली जात होती. दरडोई उत्पन्नाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. रोजगार निर्मिती होत नाही देशात प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे, तसेच महागाई वाढलेली आहे, अशी टीका सचिन पायलट यांनी केली.