"या टोपी खाली दडलंय काय?; राज्यपाल टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:04 PM2020-04-30T17:04:07+5:302020-04-30T17:16:44+5:30
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची कक्षा आणि संविधानाची चौकट याची पूर्णपणे जाणीव आहे. पण जेव्हा टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
मुंबई – राज्यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरुन राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. राज्यपालांच्या आडून भाजपा राजकारण करतंय असा आरोपही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशातच या टोपी खाली दडलंय काय? राज्यपाल टोपी घालतात तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
याबाबत सचिन सावंत यांनी म्हटलंय की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदाची कक्षा आणि संविधानाची चौकट याची पूर्णपणे जाणीव आहे. पण जेव्हा टोपी घालतात तेव्हा प्रश्न निर्माण होतो. खऱ्या अर्थाने त्यांना राज्यपाल पदाची आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव असती तर आतापर्यंत उद्धव ठाकरेंची आमदारकीसाठी नियुक्ती केली असती. मंत्रिमंडळाची शिफारस ही राज्यपालांना बंधनकारक असते. त्याप्रमाणे राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत जे निर्णय राज्यपालांनी घेतले पाहिजेत त्याची जाणीव त्यांना निश्चित असली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच एकंदर ही टोपी घातली जाते तेव्हा या जाणिवेचा विसर त्यांना पडतो त्यामुळे या संकटकाळात ही टोपी फार मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे टोपी बाजूला ठेऊन राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या आमदारकीबाबत निर्णय घेतला तर तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताकरिता होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांच्या या आरोपाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. आम्हाला मागच्या दारानं सत्ता स्थापन करण्यास रस नाही. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषद नियुक्तीवरुन राज्यपाल घटनेनुसार आणि कायद्याच्या चौकटीत जे योग्य आहे त्यानुसार निर्णय घेतील असा विश्वास आहे असं ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे आमदार झाले आणि मुख्यमंत्रिपदी कायम राहिले तर भाजपाला आनंदच आहे. राज्यात राजकीय अस्थिरता नको असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तर देवेंद्र फडणवीस हे वारंवार राज्यपालांची भेट घेत आहेत. त्यातच त्यांनी आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले आहे. हे पत्र त्यांची दिशाभूल करणारे आहे. तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू व्हावी, असं भाजपाला वाटत असून त्यासाठी सर्व प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी भाजपावर केला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचं संकट असताना उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारण सध्या राज्यात चांगलचं गाजत असल्याचं दिसून येतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
३ मे नंतर मुंबई-पुण्यातील लॉकडाऊनचं काय होणार? शरद पवारांनी दिले संकेत
१५ हजारांपेक्षा कमी पगार असणाऱ्यांसाठी केंद्र सरकाराची मोठी योजना
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?; उद्धव ठाकरे आमदार झाले अन् मुख्यमंत्रिपदावर कायम राहिले तर...
मोदी हे तो मुमकिन है! उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवरुन भाजपा आमदाराचा शिवसेनेला टोला
...अन्यथा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल; उद्धव ठाकरेंनी फोनवरुन पंतप्रधानांना सांगितलं