Raj Thackeray: सत्य ठरलं, महाराष्ट्रातील भाजपानेच हा ट्रॅप रचला; राज ठाकरेंच्या विधानानंतर काँग्रेसची प्रतिक्रिया!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 02:03 PM2022-05-22T14:03:15+5:302022-05-22T14:05:51+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत महाराष्ट्रातील भाजपानेच ट्रॅप रचला, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे.
मुंबई/पुणे- एक कुणीतरी खासदार उठतो आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो. शक्य तरी आहे का? याला अनेक पापुद्रे आहेत. काही तर असे आहेत, ज्यावर मला बोलताही येणार नाही, असं विधान मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केलं. तसेच महाराष्ट्रातली माझी ताकद हकनाक तिथे अडकली असती. ती मला तिकडे सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं टीकाही सहन करायला तयार आहे, पण पोरं अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले.
जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना विचारला. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं, असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या या विधानानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सांगितले ते सत्य ठरले. अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने.. तीथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही. विरोध करणारा भाजपाचाच हा ट्रॅप महाराष्ट्रातील भाजपानेच रचला, हे राज ठाकरे यांचंही मत आहे, असं सचिन सावंत म्हणाले.
मी सांगितले ते सत्य ठरले.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 22, 2022
"अयोध्येत गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. कोणी? योगी सरकारने तीथे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नाही."
विरोध करणारा भाजपाचाच
हा ट्रॅप @BJP4Maharashtra नेच टाकला हे राज ठाकरे यांचेही मत आहे. https://t.co/SFchjpzahT
दरम्यान, महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं. ते तिथून झालं, असंही राज ठाकरे परप्रांतियांबाबत म्हणाले.
तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?-
आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत. औरंगजेब हा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.