'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्याची भूक'; राऊत- फडणवीस भेटीवर काँग्रेसची टीका
By मुकेश चव्हाण | Published: September 28, 2020 01:02 PM2020-09-28T13:02:20+5:302020-09-28T13:16:40+5:30
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. एकमेकांवर घणाघाती टीका करणारे दोन नेते अचानक गुप्तपणे भेटल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. मात्र या भेटीत सामनातील मुलाखतीबाबत चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मात्र संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुमारे २ तास बैठक झाली, सांताक्रुझच्या ग्रँड हयातमध्ये ही बैठक झाली, त्यामुळे भविष्यात भाजपा आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर टीकास्त्र सोडले आहे.
संजय निरुपम ट्विट करत म्हणाले की, शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइन बनवण्यासाठी मोठी भूक लागली आहे. ही भूक नेहमी नेत्याची राजकीय कारकीर्द उद्धवस्त करते. ही दुर्भावना नाही तर वास्तविकता आहे, असं संजय राऊत यांनी सांगितले.
ऐसा लगता है शिवसेना के कंपाउंडर को हेडलाइन बनाने की भारी भूख लग गई है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) September 27, 2020
यही भूख अक्सर नेताओं को खा जाती है।
यह दुर्भावना नहीं, एक वास्तविकता है।#GrandHyatt
मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना - राऊत
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.
आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर
ज्या आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.
महत्त्व देण्यास नकार
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस-राऊत यांच्या भेटीला फारसे महत्व देण्याचे नाकारले. तर, शरद पवारांसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा होत असते. शरद पवार हे आघाडीचे नेते आहेत, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने देखील पवार-ठाकरे भेट ‘रुटिन’ असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक म्हणाले, गेल्या नऊ महिन्यात मुख्यमंत्री आणि शरद पवार असंख्यवेळा भेटले आहेत. कधी ते मातोश्रीवर गेले, कधी महापौर बंगल्यावर भेट झाली, तर कधी वर्षावर. दर वेळी शरद पवार राज्यातील वेगवेगळ्या कामांचे मुद्दे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात. त्यामुळे त्यात नवीन काही नाही, सरकार व्यवस्थित चालू आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.