"वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल...",काँग्रेसच्या नेत्याची राज ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:34 PM2024-04-09T23:34:04+5:302024-04-09T23:41:24+5:30
राज ठाकरे यांनी आज पाडवा मेळाव्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज पाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. वडेट्टीवार म्हणाले, राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्यावेळी ते भाजपासोबत जाणार हे मराठी जनतेला कळले होते. वाघाची शेळी झाली. पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल, असे वाटले नव्हते. राज ठाकरे या लढवय्या नेत्याने गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला.
फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा
"राज ठाकरे महायुतीत गेल्याने महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही. कदाचित राज ठाकरेंची एखादी नस दाबली असेल. 'दाल मे कुछ तो काला है'. राज ठाकरे आधी थोडेसे झुकले होते, आता कमरेतून झुकले ,हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य होणार नाही,असा टोलाही वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंना लगावला.
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर मनसे मनसे महायुतीत सामील होऊन लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली. आज अखेर राज ठाकरेंनी त्या सर्व चर्चांवर सविस्तर भाष्य केले.
यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले की, मी काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांशी आणि एकनाथ शिंदेशी बोललो. त्यांना सांगितले की, मला या वाटाघाटीत पाडू नका. मी त्यांना स्पष्टपणे सांगितले, मला राज्यसभा किंवा विधानपरिषद नकोय. या देशाला पुढे नेण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी माहिती राज ठाकरेंनी यावेळी दिली. तसेच, मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचे निर्देशही दिले. राज ठाकरे म्हणाले, सर्व मनसैनिकांना एकच सांगतो. आगामी विधानसभेच्या कामाला लागा. पुढच्या गोष्टी पुढे. मी लवकर तुम्हाला भेटायला येत आहे. मला जे मांडायचे असेल, ते मांडेल.